

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी, मोडी लिपीचा अभ्यास असलेल्या जाणकारांनी, मोडी लिपी वाचता येणाऱ्यांनी तसेच फारसीच्या अभ्यासकांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येऊन भेटावे, असे आवाहन केले आहे.
पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांनी मोडी लिपी आणि फारसी भाषेच्या अभ्यासकांना येत्या काही दिवसांत रुग्णालयात येण्याचे आवाहन केले आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारच्या समितीसोबत काम करण्यासाठी या अभ्यासकांची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोडीलिपी अभ्यासकांनी गॅलेक्सी हॉस्पिटलला यावे. उद्यापासून रविवारपर्यंत सर्वांनी रुग्णालयात यायचे आहे. फोनची वाट पाहू नका. आम्हाला मोडीलिपीचे अभ्यासक कोण आहेत हे माहीत नाही. त्यामुळे तुम्ही २७ सप्टेंबरच्या आत रुग्णालयात येऊन भेटा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जेथे जेथे मोडी लिपीचे अभ्यासक असतील त्यांनी आज-उद्या, शनिवार, रविवार या पाच-सहा दिवसांत येऊन मला भेटावे.
सामोरे जाण्याची तयारी
जरांगे-पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, आरोपांची होऊ द्या चौकशी. सगळे सामोरे जायला तयार आहे. तुमच्याशी मैत्री करून आरक्षण सोडायला आम्ही दोन बापाची औलाद नाही, असे ते म्हणाले.
जुना रेकॉर्ड शोधायचा आहे...
मनोज जरांगे-पाटील यांनी केवळ मोडी लिपीच्या अभ्यासकांनाच नव्हे तर फारसीच्या अभ्यासकांनाही रुग्णालयात येण्याचे आवाहन केले आहे. मोडी लिपीच नव्हे फारशीच्या अभ्यासकांनीही रुग्णालयात यायचे आहे. तुमच्या नशिबाने तुम्हाला सेवा करण्याची संधी आली आहे. तुम्हाला विशेष अधिकार दिला जाईल. आपल्याला जुना रेकॉर्ड शोधायचा आहे, हैदराबाद संस्थानातील जुने बाड शोधायचे आहेत. ही सर्व लिखापढी फारसी आणि मोडीलिपीत आहेत. मी तुमची नावे सरकारला देणार आहे. तुम्हाला वंशावळ जुळवणे, फारशी आणि मोडीलिपीची माहिती असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.