मनोज जरांगेंवरील "संघर्षयोद्धा" सिनेमा 'या' तारखेला होणार प्रदर्शित, अंतरवाली सराटीत शूटिंग झाले सुरू

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार
मनोज जरांगेंवरील "संघर्षयोद्धा" सिनेमा 'या' तारखेला होणार प्रदर्शित, अंतरवाली सराटीत शूटिंग झाले सुरू
Published on

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे "संघर्षयोद्धा" - मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे, सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी "एक मराठा, लाख मराठा" म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील... आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त़्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत़्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे, ह्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांन मध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे , त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल़्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in