

जालना / मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, तर राज्य सरकारने द्वेषभावनेतून ही परवानगी नाकारली असून आपले उपोषण ठरल्यानुसार होईल, असे जरांगे यांनी जाहीर केले आहे. सरकारच्या निषेधार्थ आपण पाणी आणि औषधोपचारही बंद करीत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवादरम्यान राज्यात या मुद्द्यावरून तणावाची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसण्याची घोषणा जरांगे यांनी शनिवारी केली होती. त्या संदर्भात हमीपत्र देखील जरांगे-पाटील यांच्या वतीने आझाद मैदान पोलिसांना देण्यात आले होते.
आपल्याकडून विविध नियमांचा भंग जाणीवपूर्वक करण्यात येईल याबाबत खात्री पटलेली आहे, असे पोलिसांनी जरांगेंना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. दक्षिण मुंबई परिसरातील शाळा, रुग्णालय, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक व सार्वजनिक आरोग्य इत्यादी बाबी बाधित होऊन सार्वजनिक सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने परवानगी नाकारली जात आहे, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रस्तावित आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गानेच केले जाईल, असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला. तसेच मराठा समाजाने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अलीकडील पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, कठीण काळानंतर शेतीची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे समर्थकांना मुंबईतील आंदोलनात सहभागी होणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
जबाबदारी फडणवीसांचीच असेल
पोलिसांच्या उत्तरावर जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. न्यायालयाने आडकाठी केलेली नसताना सरकार का अडवत आहे. असा सवाल करून ते म्हणाले की, सोयीनुसार कायदा चालवता येणार नाही. फडणवीस यांना न्यायदेवतेसह सगळ्यांचा अवमान करायचा आहे. ही हुकूमशाही आणि गुंडगिरी आहे. मुख्यमंत्री राज्य अस्थिर करीत आहेत असा आरोप करून त्यांनी पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी फडणवीसांचीच असेल, असे जाहीर केले.
मरेन, पण शरण जाणार नाही
मुंबईत प्रस्तावित शांततामय मोर्चादरम्यान मला ठार मारण्याचा आणि गोंधळ निर्माण करण्याचा कट रचण्यात आला आहे. मात्र मी दबावाला बळी पडणार नाही. एकवेळ मृत्यू स्वीकारेन, पण शरण जाणार नाही.
सरकारकडे प्रश्न सोडवण्यासाठी अद्याप आठ दिवस आहेत. पण कोणी सापाच्या शेपटीवर पाय दिला, तर त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागेल.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील काही मराठा आमदार त्यांच्या समर्थकांना फोन करून मोर्चात सहभागी न होण्याचे आवाहन करत आहेत.
आमचा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी मुंबईला जात आहे. माझी चूक काय आहे? मी कायदा मोडत आहे का ? तुम्हाला अटी घालायच्या असतील तर घाला.