Manoj Jarange Patil: जरांगे-पाटील यांच्या किडनी-लिव्हरला काहीशी सूज

प्रकृती सुधारासाठी काही दिवस जातील, असे डॉक्टरांचे मत
Manoj Jarange Patil: जरांगे-पाटील यांच्या किडनी-लिव्हरला काहीशी सूज

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बेमुदत उपोषणानंतर नऊ दिवसांनी गुरुवारी उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या किडनी व लिव्हरला सूज असून त्यांची उपोषणामुळे खालावेली ही प्रकृती पूर्ववत होण्यासाठी काही दिवस जावे लागतील, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील उल्कानगरी भागातील एका खासगी रुग्णालयात जरांगे-पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा मूत्र आणि क्रिएटिनाइन यांचा स्तर प्रमाणापेक्षा अधिक असल्याने तो स्तर योग्य स्तरावर येण्यासाठी काही दिवस जातील, पाणीही न घेतल्याने त्यांच्या किडनी व लिव्हरवर परिणाम झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागासारखी व्यवस्था उभारण्यात आली आहे.

जरांगे यांनी शुक्रवारी सकाळी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी २४ डिसेंबर ही अखेरची मुदत सरकारला दिली असल्याचे सांगितले होते. याचे कारण त्यांना विद्यमान सरकार ३० डिसेंबरपर्यंत राहणार नाही, याचा विश्वास वाटतो, यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे जरांगे-पाटील यांनी नाकारले, ही राजकीय विधाने असून त्यावर बोलण्याचा मला काही हक्क नाही, आज विविध समित्या संबंधित प्रश्नावर काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपण आपले उपोषण समाप्त केले असले तरी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन चालूच राहील. साखळी उपोषण चालूच राहील, असे त्यांनी सांगितले.

सरकारने हा मराठा आरक्षणाचा प्रश्न २४ डिसेंबरपर्यंत सोडवावा, असे गुरुवारी सांगितले होते. जर दोन महिन्यांमध्ये निर्णय घेतला गेला नाही तर मुंबईमध्ये मोठा मार्च काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in