जरांगे-पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार; आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास विधानसभेची तयारी करणार

जरांगे-पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार; आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास विधानसभेची तयारी करणार

मला सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिल्यामुळे मी खासदार झालाे असतो, परंतु...

मुंबई : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. लोकसभेची नाही, परंतु विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही जोरात करणार आहोत. तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर ४ जूनपासून मी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.

बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने देशातील नागरिकांना न्याय दिला आहे. माझा लोकचळवळीचा मार्ग मला माहीत आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही उतरलो नाही, परंतु विधानसभेची तयारी जोरात करणार आहोत. मराठा कोणाच्या सभांना देखील जात नाही. ते फक्त मजा बघत आहेत. ते उमेदवारांना पाडणार आहेत. तोदेखील आमचा मोठा विजय ठरेल. डॉ. प्रकाश आंबेडकर यांना ६ जातीधर्माचे लोक एकत्र आणता आले असती. पण आम्हाला वेळ कमी होता. लोकसभा निवडणूक खूप मोठी असते, असे जरांगे-पाटील म्हणाले. आता आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण ४ जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहोत. आम्हाला महायुतीने काही दिले नाही, पण महाविकास आघाडीवाले तरी कुठे शहाणे आहेत. त्यांनी तर होते ते आरक्षणही घालवले. मराठा आरक्षण गोरगरीबांचा लढा आहे. तो आता यशस्वी होणारच, असे ते म्हणाले.

राजकारण हे माझे क्षेत्र नाही

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही, भावनेचा वापर करून राजकारणात मतं घेता येत नाहीत. मी निवडणूक लढणार नाही. मला माझा मराठा बांधव महत्त्वाचा आहे. मला सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिल्यामुळे मी खासदार झालाे असतो, परंतु राजकारण हे आपले क्षेत्र नाही, असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in