मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. मात्र, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यायला हवे. सग्यासोयऱ्यांची जी अधिसूचना काढली आहे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु सरकारने जाणीवपूर्वक टाळले आहे. त्यामुळे यापुढेही आरक्षणाचा लढा सुरूच राहणार असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज बांधवांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे यावे, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा तीव्र होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मराठा समाजाला आता नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. आम्ही या आरक्षणाची मागणीच केली नव्हती. मात्र, सरकार हे आरक्षण मराठा समाजावर थोपवत आहे. परंतु हे आरक्षण टिकणार नाही. पुन्हा मराठा समाजाला वणवण भटकविण्याचे काम हे सरकार करणार आहे. त्यामुळे हे तकलादू आरक्षण आम्हाला नको आहे. आम्हाली ओबीसीतूनच आरक्षण दिले पाहिजे. तेच आरक्षण टिकू शकते. त्यामुळे राज्य सरकारने सगेसोयºयाची जी अधिसूचना काढली होती. त्याचीच अंमलबजावणी करायला हवी. तुम्हाला अंमलबजावणीच करायची नव्हती तर मग अधिसूचना काढलीच का, असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून सहा महिन्यांचा कालावधी दिला. परंतु सरकारने आमचा अपेक्षाभंग केला. आता जे दिलेले आरक्षण आहे, ते निवडणुकीपर्यंतच टिकेल. पुन्हा काय आम्ही बोंबलत बसायचे का, असा सवाल उपस्थित करीत सगेसोयºयांसंबंधी जी अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी करावी, हीच आमची मागणी आहे. आम्ही प्रत्येकवेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचे वाटोळे होऊ देणार नाही. आमच्या हक्काचे जे आरक्षण आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे. हरकतीचा विषय पुढे करून मराठा समाजाचा अपमान केला गेला आहे. मात्र, हे सहन केले जाणार नाही. आम्हाला जे आरक्षण हवे आहे, ते आम्ही मिळविणारच, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी बोलून दाखविला. एवढेच नव्हे, तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मराठा समाजाने बुधवारी (उद्या) अंतरवाली सराटी येथे यावे. यावर विचार विनिमय करून उद्या निर्णायक बैठक घेतली जाणार असून, मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
उपचार बंद, सलायन फेकले
मराठा आरक्षणात राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे सांगत आज त्यांनी उपचार बंद केले. तसेच लावलेले सलायनही उपसून फेकले. त्यामुळे मराठा समाजाचा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.