"...तर विधानसभेला नाव घेऊन उमेदवार पाडू"; जरांगेंचा राज्य सरकारला इशारा, एक महिन्यासाठी उपोषण स्थगित

"१३ जुलै पर्यंत निर्णय न घेतल्यास निवडणूकीत उतरणार, उमेदवार न दिल्यास नाव घेऊन पाडणार..." असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरु केलेलं आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपोषण एक महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जरांगेंनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला असून, १३ जुलैपर्यंत निर्णय घेतल्यास निवडणुकीत उतरणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. उमेदवार दिले नाहीत, तर नाव घेऊन पाडणार, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

राज्यसरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला-

राज्यातील एका मंत्र्यानं आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सलाईनद्वारे द्रवपदार्थ घेण्यास सुरुवात केली होती. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. तथापि, सरकारनं तातडीने आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही तर सलाईनद्वारे द्रवपदार्थ घेणे थांबविण्यात येईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली होती. आज कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई आणि छत्रपती संभाजीनंगरचे खासदार संदीपन भुमरे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यादरम्यान अनेक मागण्यांवर चर्चा झाली. सगे सोयरे ही व्याख्या आम्ही दिल्या प्रमाणे आणली पाहिजे, मराठा आणि कुणबी एकच आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण एक महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जरांगेंनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला असून, १३ जुलैपर्यंत निर्णय घेतल्यास निवडणुकीत उतरणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. उमेदवार दिले नाहीत, तर नाव घेऊन पाडणार, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. प्रकृती खालावल्यामुळं जरांगेंवर गॅलक्सी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू: शंभुराज देसाई

कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, "मराठा बांधवांसाठी लढा जरांगे करीत आहेत. सरकारच्या वतीने विनंती करायला आलोय. त्यांची तळमळ मला माहीत आहे. मराठा बांधव म्हणून सांगतो, दहा टक्के आरक्षण जरांगेंमुळेच दिलं गेलंय. सगे सोयरेबाबत शासन सकारात्मक आहे. लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेमध्ये वेळ गेला. कर्मचारी निवडणुकीत गुंतले. उद्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतो. मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. एक महिन्यात सकारात्मक काम करू. एसआयटीबाबत माझं बोलणं झालं नाही, असं म्हणत शंभूराजे यांनी जरांगेंना उपोषण सोडण्याची विनंती केली.

logo
marathi.freepressjournal.in