मुंबईच्या वेशीवर आलेल्या जरांगेंना पोलिसांची नोटीस; आझाद मैदानात परवानगी नाकारली, सूचवलं 'हे' मैदान

एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता...
मुंबईच्या वेशीवर आलेल्या जरांगेंना पोलिसांची नोटीस; आझाद मैदानात परवानगी नाकारली, सूचवलं 'हे' मैदान

मराठा समाजाला सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईत उपोषण करण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यांच्यासह असंख्य आंदोलक आज नवी मुंबईत दाखल होत आहेत. त्यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवली आहे. यामध्ये, आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली असून नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान आंदोलनासाठी योग्य असल्याचे सुचवण्यात आले आहे.

काय म्हटलंय पोलिसांच्या नोटीसमध्ये ?

सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठया वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होवून मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे ७००० स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० ते ६००० आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे. तसेच, उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून खेळासाठी राखीव मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच, शिवाजी पार्क मैदानातही विनापरवानगी आंदोलन केल्यास तो कोर्टाचा अवमान ठरेल, २६ जानेवारीनिमित्त आयोजित तेथील कार्यक्रमात अडथळा येईल असे आणि तिथेही मोठ्या संख्येतील आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. कोर्टाने आम्हाला आंदोलनासाठी योग्य जागा कळविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, शांततामय मार्गाने आंदोलनासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान आंदोलनासाठी योग्य आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांना दिलासा देत त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याची विनंती करणार्‍या याचिकेची गंभीर दखल घेतली आणि आंदोलकांना योग्य ती जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. आंदोलन करणे, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र मुबलक जागा असेल तेथे त्यांनी आदोलन करावे. तशी जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट करताना कायदा सुव्यवस्था राखा, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते. तसेच, प्रतिवादी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला नोटीस बजावण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

दरम्यान, एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलकांची भूमिका काय असणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in