"मराठा नेत्यांनो शहाणे व्हा; ओबीसी नेते त्यांच्या समाजासाठी..." जरांगे-पाटील कडाडले

आपल्या नेत्यांना आता बोलायचं थोडं कमी करा. आपण आपल्याच नेत्याला झोडतोय. ते नालायक आहेत म्हणतोय, असं जरांगे म्हणाले.
"मराठा नेत्यांनो शहाणे व्हा; ओबीसी नेते त्यांच्या समाजासाठी..." जरांगे-पाटील कडाडले

जालना : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी वडिगोद्री येथे जाऊन ओबीसी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आज संध्याकाळी ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार आहे. यामध्ये पंकजा मुंडे, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, विजय वडेट्टीवार इत्यादी ओबीसी नेत्यांचा समावेश आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी नेते त्यांच्या समाजासाठी एकत्र येतात, तसे मराठा नेत्यांनीही समाजासाठी समोर यावं, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा नेत्यांना केलं.

मराठा नेत्यांनो शहाणे व्हा....

मराठा नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन करताना जरांगे म्हणाले की, "मराठ्यांच्या नेत्यांनो आता यातून बाहेर पडा, जातीच्या मागे उभं राहायला शिका. बोललं असेल तुम्हाला कुणी, मी नाकारत नाहीये. मराठा नेत्याला त्रासही दिला असेल. पण जाऊद्या आपले आहेत. त्यांच्या त्रासापेक्षा हा त्रास कमीच आहे. हे तर आपल्या जातीच्या लेकरांची मुंडकीच छाटायला लागलेत. शहाणे व्हा, जरा बदला. ओबीसी नेते त्यांच्या आंदोलनात जाऊ शकतात, तर मराठ्यांचे नेतेही येऊ शकतात."

आपल्या नेत्यांना नालायक म्हणायचं बंद करा...

"मराठा समाजाच्या पोरांनो आपल्याला एक गोष्ट बदल करायला हवी. आपल्या नेत्यांना आता बोलायचं थोडं कमी करा. आपण आपल्याच नेत्याला झोडतोय. ते नालायक आहेत म्हणतोय. पण ओबीसी नेते नालायक असून त्यांचा समाज त्यांना काही म्हणत नाही. चांगलाच आहे म्हणतात. आता बदल करा. आपल्या नेत्यांना काहीबाही बोलणं बंद करा. ते त्यांच्या नेत्यांना जवळ करायला लागलेत आणि आपल्या नेत्यांना दूर लोटायला लागलेत. आपण त्यांच्याही नेत्यांना दूर लोटतोय आणि आपल्याही नेत्यांना दूर लोटतोय. आता आपल्या लोकांनीसुद्धा आपल्या नेत्यांना बोलायचं बंद करा," असं जरांगे म्हणाले.

पडलात तर पडलात, लाचारी पत्करू नका...

ते पुढे म्हणाले की, "आपणही यांचं शिकू. ओबीसी नेत्यांकडून शिकावं जातीवाद काय असतो. मराठ्यांच्या नेत्यांनो जरा शिकावं त्यांच्याकडून. निवडणूका झाल्या की ते एक झाले. कधीतरी लाज वाट वाटूद्या. पडलात तर पडलात, लाचारी पत्करू नका. जातीकडून राहा. ओरिजनल नोंदी सापडल्यात, त्याही रद्द करा म्हणतायत. आपल्या हक्काचं आरक्षण ओरबडायचंय. मी ओबीसी नेत्यांचा बुरखा फाडलाय. मराठ्यांनी विचार बदला. आपल्या ओरिजनल नोंदी रद्द करायला निघालेत. ते बोगस आरक्षण खातायत. मंडल कमिशननं फक्त १४ टक्के आरक्षण दिलं आहे. मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना सांगतो ते रद्द करा."

१०० टक्के तुम्ही मराठ्यांवर अन्याय करणार....

जरांगे पुढे म्हणाले की, "फडणवीसांवर आम्ही विश्वास ठेवला. शंभुराजे देसाई म्हणाले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवा. तुम्ही अन्याय होऊ देणार की नाही ते आमच्या लक्षात आलंय. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावामुळं मराठ्यांवर अन्याय करणार आहे. १०० टक्के तुम्ही मराठ्यांवर अन्याय करणार आहे. तुमच्या सगेसोरऱ्यांच्या व्याख्या बदलायला लागल्या आहेत. तुम्ही हैदराबादचं गॅझेट सापडलंय, ते लागू करत नाही. शिंदे आणि फडणवीस साहेब तुम्ही का सांगत नाही की, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, ते आरक्षण आम्ही देणार. हैदराबादचं गॅझेट १५०-२०० वर्ष जुनं आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी साताराचं गॅझेट आहे. मुंबई गॅझेटही आहे, तुम्ही का सांगत नाही. तुम्ही ठासून सांगा, दुसऱ्या दिवशी जातीवाद बंद होईल."

logo
marathi.freepressjournal.in