जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील हे गणेश आगमनादिनी बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणेमार्गे पुढे लोणावळा, वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहोत, याबाबतची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. आरक्षण न दिल्यास सरकार उलथून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे हे महाकाळा, शहागड, वडीगंधारी फाटा, डोंगलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, आंबेटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवळी, आपेगाव माउलींचे, वाघाडी, पैठण, उंचेगाव, पाटेगाव, तळणी, शेवगाव, वडुली, मळेगाव, मिरी नाका, पांढरी पूल, अहिल्यानगरच्या बायपासमार्गे कल्याण फाट्यावर जाणार. तेथून पुढे आळेगाव, नारायण गाव आणि २७ ऑगस्ट रोजी जुन्नर येथील शिवनेरी गडावर पोहोचणार आहेत.
२८ ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडावरील पवित्र माती कपाळावर लावून राजगुरू खेडमार्गे आपण चाकणला जाऊ. तेथून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे सायंकाळी आपण आझाद मैदानाला पोहोचणार. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी सकाळपासून आपले आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल, असे जरांगे यांनी सांगितले.
“आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. मराठा आणि कुणबी एक आहेत, हा अध्यादेश आम्हाला मंजुरीसह अंमलबजावणी करून पाहिजे. हैदराबाद गॅझेट लागू करून पाहिजे, तुम्ही कारणे सांगणार तर आम्ही ते ऐकणार नाही. आमच्या नोंदी सरकारी आहेत, त्याला विरोध करण्याचा विषय नाही. आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला.
१० टक्के आरक्षण कधीही जाऊ शकते
सरकारकडून देण्यात आलेले १० टक्के आरक्षण कधीही जाऊ शकते. आम्हाला आमच्या हक्काची जमीन द्या, भाड्याने घर देऊ नका, अशी मागणी जरांगेंनी केली. दीडशे वर्षांपूर्वी आमच्या नोंदी आहेत, त्याची व्याख्या देण्यात आली आहे. पण सगेसोयऱ्यांचा आदेश काढून दीड वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा अजूनही संयमी आहे, सरकारच्या हातात आज फक्त दोन दिवस आहेत. सरकारने महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांना वेठीस धरू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर दगडफेक
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराईत बॅनर लावण्यात आल्यामुळे गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. रविवारी गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. त्याच चौकात ते आले असताना, त्यांच्या अंगावर आधी चप्पल भिरकावली, नंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.