मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक महिण्यांपासून राज्यभरात चालला आहे. राज्यात मराठा समाजाच्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या मागणीसाठी संपूर्ण राज्यात प्रचार, मोर्चे, उपोषणे, रॅली करण्यात येत होती. इतकंच नाही तर मनोज जरांगे-पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण देखील केलं होतं. मात्र, तरी सरकारनं ठोस निर्णय सांगितला नाही. जरांगेंनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. असं असताना मनोज जरांगे-जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याला 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. महत्वाचं म्हणजे जरांगेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी सरकारवर गंभीर आरोप आणि टीका केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा करताना जरांगे-पाटील हे आपल्या सभांमधून काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
मनोज जरांगे हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात मनोज जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह राज्यात अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केलं जाणार आहे, असं जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.