"...तर मोदींचं विमान खाली उतरू दिलं नसतं", मनोज जरांगे यांचं पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यावर मोठं विधान

नरेंद्र मोदी हा विषय हाताळतील अशी आशा गोरगरिबांना होती, असं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे.
"...तर मोदींचं विमान खाली उतरू दिलं नसतं", मनोज जरांगे यांचं पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यावर मोठं विधान
Hp

आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ देऊनही ठोस निर्णय घेतला नसल्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. याचदरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मोदींनी मराठा समाजाच्या आरक्षणावर कोणतही भाष्य केलं नाही. यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर भाष्य केलं आहे.

जालन्यातील आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. याचं दरम्यान माध्यमांशी संवाद साधतांना मनोज जरांगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाच्या आंदोलनाविषयाशी माहिती नसेल का? मोदी मुद्दामहून या विषयावर काल काही बोलले नाहीत अशी दाट शंका आम्हाला आहे.

काल मोदींनी सभेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर भाष्य केलं नाही. याचा अर्थ त्यांनी हा विषय जाणूनबुजून काढला नाही असा या अर्थ होतो. हा संभ्रम आणि शंका मराठा समाजाच्या लोकांच्या मनात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता गोरबरिबांची गरज राहिली नाही, असा त्यातून अर्थ काढला जात आहे. यातून अजून दोन अर्थ निघतात ते म्हणजे की ,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून पंतप्रधानांना याबद्दल सांगितलंच नाही किंवा त्यांनी सांगून देखील पंतप्रधान मोदी जाणूनबुजून याविषयी बोलले नाहीत. दोन्हीपैकी एक शंका जनतेच्या मनात आहे, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांबाबत काही वाईट भावना नव्हती आणि कधी नसेल. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्याबाबत वाईट भावना असती तर त्यांनी पंतप्रधानांचं विमान शिर्डीला खाली देखील उतरवू दिलं नसतं, वरचेवरच लावलं असतं, असंही मनोज जरांगे म्हणाले. नरेंद्र मोदी हा विषय हाताळतील अशी आशा गोरगरिबांना होती. मात्र, एवढ्या जवळ येऊनही मोदी या विषयांवर काही बोलले नाहीत त्यामुळे मराठा समाजात नाराजीचा सुर पसरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in