"...तर मात्र सुट्टी नाही", प्रकाश शेंडगेंच्या विधानावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

"आमच्या नेत्यांचे घरे जाळायला येणाऱ्यांचे हात कलम करु", असा इशारा शेंडगे यांनी दिला होता.
"...तर मात्र सुट्टी नाही", प्रकाश शेंडगेंच्या विधानावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

रविवार (२६ नोव्हेंबर) रोजी हिंगोलीत ओबीसींचा दुसरा 'एल्गार मेळावा' पार पडला. या सभेतून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी बीड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं होतं. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड आणि माजलगावममध्ये मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली होती. यावर प्रकाश शेंडगे यांनी भाष्य केलं होतं. "आमच्या नेत्यांचे घरे जाळायला येणाऱ्यांचे हात कलम करु", असा इशारा शेंडगे यांनी दिला होता. आता याला मनोज जरांगे-पाटील यांनी प्रकाश शेंडगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मी जातीसाठी पाय तोडून घेण्यास तयार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले होते प्रकाश शेंडगे?

आता पिस्तूल काडतुसे सापडली आहेत. असलं आंदोलन असतं का? आम्ही तुमच्यावर खडाही टाकत नाही. जे हात आमच्या नेते, कार्यकर्त्यांची घरे जाळायला येतील, ते कलम केले जातील, असं विधान प्रकाश शेंडगे यांनी केलं होतं. यावर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं होते. "या वयात पाय आणि हात तोडण्याची भाषा करत आहेत. पाय तोडायला यावं मी जातीसाठी पाय तोडून घेण्यास तयार आहे"

मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, "मराठा आंदोलनाच्या विरोधात विधान केलं तर सुट्टी नाही. जातीयवादी वक्तव्य करत असल्याने चार-पाच नेते यांना(छगन भुजबळ) सोडून गेले आहेत. जुने नेते आहात, अनुभवही अधिक आहे. पांढरी केस होऊन उपोयग नाही. जाती-जातींमध्ये दंगली घडवण्याचं काम करत आहात. सरकार देखील त्यांच्या दबावात येत आहे. सरकारने ओबीसी नेत्यांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करु नये." असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in