मीरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी

मीरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मिरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज साने याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज मनोज साने याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मनोज साने हा प्रेयसी सरस्वती वैद्यसोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दोघांमध्ये झालेल्या वादातून आरोपी मनोजनं सरस्वतीची निर्घूण पद्धतीने हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

मिरा रोड येथील नया नगर पोलिसांना एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर पोलिसांना मोठा धक्का बसला. या ठिकाणी पोलिसांना मृतदेह कापण्यासाठी वापरण्यात आलेलं कटर तसंच इतर धारदार शस्त्रे आढळून आले. तसंच किचनमध्ये मृतदेह आढळून आला. यावेळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरु असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांना देखील हा प्रकार पाहून धक्का बसला.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करत मनोज सानेला अटक केली. त्यानंतर त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाने आरोपीला पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर कोर्टानं आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मनोज साने हा 56 वर्षाचा असून पीडित मृत सरस्वती वैद्य 32 वर्षाची होती. ते मीरा भाईंदर येथे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मनोजनं सरस्वतीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायला पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला. त्याने पीडितेचे कटरच्या सहाय्याने तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि मिक्सरमध्ये बारीक केले. पोलिसांनी हत्येसाठी आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य जप्त केलं आहे. तसंच हत्येला वादाशिवाय अन्य कोणतं कारण आहे का याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in