आता अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश फक्त ‘डीजी ॲप’वरच; १५ ऑगस्टपासून ऑफलाइन पास बंद

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर 'डीजी ॲप'वर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. 'डीजी ॲप' वर नोंदणी असणाऱ्या अभ्यागतांनाच आता मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई: कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर 'डीजी ॲप'वर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. 'डीजी ॲप' वर नोंदणी असणाऱ्या अभ्यागतांनाच आता मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. मंत्रालयातील सुरक्षा व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंत्रालयाजवळील गार्डन गेटजवळ असलेल्या ९ व नवीन प्रशासकीय इमारतीतील १ ऑफलाइन पास मिळणाऱ्या एकूण १० खिडक्या १५ ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहेत.

कामानिमित्त राज्यभरातील लोक मंत्रालयात धाव घेतात. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अभ्यागतांसह वकील, राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना गार्डन गेटजवळील खिडकीवर ऑफलाइन पास काढणे बंधनकारक आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी गार्डन गेट जवळ ऑफलाइन पाससाठी ९ खिडक्या, तर नवीन प्रशासकीय इमारतीत १ खिडकी अशा एकूण १० खिडक्यांवर ऑफलाइन पास उपलब्ध होतो. मात्र मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने १५ ऑगस्टपासून खिडक्यांवर ऑफलाइन पास देणे बंद करण्यात येणार आहे.

मंत्रालय म्हटले की, मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती यांची ये-जा सुरू असते. मंत्रालयात येणाऱ्या व्हीव्हीआयपीची सुरक्षा व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्च २०२५ मध्ये फेस डिटेक्शन व 'डीजी ॲप' प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे आता ऑफलाइन पास पद्धत बंद करण्यात येणार असून अभ्यागतांना आता 'डीजी ॲप' वरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे, असे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना सांगितले. दरम्यान, कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणाली अंमलात आणली. या दोन्ही प्रणालीमुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे निकम यांनी सांगितले.

स्मार्ट फोन नसलेल्यांसाठी पर्यायाचा शोध

१५ ऑगस्टपासून ऑफलाइन पास मिळणाऱ्या १० खिडक्या बंद करण्यात येणार आहेत. त्यात राज्यभरातून येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांकडे स्मार्ट मोबाईल असेलच असे नाही. त्यामुळे डीजी प्रवेश ॲपवर त्यांना नोंदणी करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी करणे शक्य नसलेल्यांसाठी लवकरच पर्याय उपलब्ध करण्यात येणार असल्याचे चेतन निकम यांनी सांगितले.

असा डाऊनलोड करा ‘डीजी ॲप’

डीजी प्रवेश ॲप हे मोबाईल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईलच्या प्रणालीनुसार अँड्राॅईडमध्ये प्ले स्टोअरवर, तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर डीजी प्रवेश (digi pravesh) हे सर्च केल्यास हे ॲप विनामूल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश मिळतो.

logo
marathi.freepressjournal.in