मान्याचीवाडी गावाने मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालय विभागाचे संचालक दिग्विजय पाटील यांचे आवाहन

शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण विभागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मधकेंद्र योजनेचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे.
मान्याचीवाडी गावाने मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालय विभागाचे संचालक दिग्विजय पाटील यांचे आवाहन
Published on

कराड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिलांसाठी राज्य शासनाची मधकेंद्र योजना आर्थिक उन्नतीचे साधन ठरणारी असून त्यासाठी शासनाची ही योजना गावागावात चळवळ म्हणून राबविण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा.ग्रामीण विकासात दिशादर्शक ठरलेली मान्याचीवाडी ने आता मधाचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालय विभागाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी केले.

मान्याचीवाडी ता.पाटण येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग आणि मान्याचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित मधुमक्षिका पालन विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

जि प चे माजी शिक्षण सभापती उत्तमराव माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी झालेल्या या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी राजाराम लोखंडे, मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, विस्तार अधिकारी पंकज हलकंदर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश मिरजकर, सरपंच रवींद्र माने, पर्यवेक्षक एम. के. लकेरी, एम. एस. घोलप, आर. जे. लाडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण विभागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मधकेंद्र योजनेचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील मांघर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव या दोन गावात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येत असून तेथे हा प्रकल्प यशस्वी झाल्याने आता ही योजना गावागावात चळवळ म्हणून उभी करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यांसह महिला आणि सुशिक्षित तरुणांनी मध उद्योगासाठी आपले कौशल्य दाखविल्यास सुशिक्षितांनाही रोजगार उपलब्ध होईल. यासाठी येथील ग्रामस्थांनी सकारात्मक विचार केल्यास गावातच प्रशिक्षणाची सोय केली जाईल. मधाचे गाव योजनेचा शासन आदेश झाल्यानंतर पहिलीच कार्यशाळा मान्याची वाडी सारख्या उपक्रमशील गावात होत असल्याने आता मधाचे गाव म्हणून मान्याचीवाडीने आपली ओळख निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

सरपंच रवींद्र माने म्हणाले, शासनाची ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आणि मधाचे गाव म्हणून गावाची ओळख निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे व ते तुमच्या गावात सुरू करता येईल. त्याबरोबर या उपक्रमासाठी गावपरिसरात शिवार फेरी काढून त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मार्ग काढायला हवा.

यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम लोखंडे, चंद्रकांत कोळी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तर पर्यवेक्षक लकेरी यांनी मधकेंद्र योजना आणि मधुमक्षिका पालन याबाबत प्रबोधन केले. राजेश मिरजकर यांनी स्वागत केले.आभार पर्यवेक्षक एम.एस.घोलप यांनी मानले.

logo
marathi.freepressjournal.in