माओवादी चळवळीला मोठा हादरा; नक्षली नेता 'भूपती'सह ६० जणांचे आत्मसमर्पण

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागात अनेक वर्षे माओवाद्यांचा म्होरक्या असलेल्या मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने भामरागड येथे ६० साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर अखेर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नसली तरी १५ ऑक्टोबरला तो मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवून, हाती संविधान घेणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.
माओवादी चळवळीला मोठा हादरा; नक्षली नेता 'भूपती'सह ६१ जणांचे आत्मसमर्पण
माओवादी चळवळीला मोठा हादरा; नक्षली नेता 'भूपती'सह ६१ जणांचे आत्मसमर्पण
Published on

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागात अनेक वर्षे माओवाद्यांचा म्होरक्या असलेल्या मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने भामरागड येथे ६० साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर अखेर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नसली तरी १५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवून, हाती संविधान घेणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.

छत्तीसगडसह महाराष्ट्रात नक्षलवादविरोधी आक्रमक मोहिमा सुरू आहेत. अनेक महत्त्वाचे नेते चकमकीत ठार झाले, तर काहींनी शस्त्र खाली ठेवले. या पार्श्वभूमीवर माओवादी चळवळीत उभी फूट पडल्याचे देखील दिसून आले. भूपतीने युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता, यावरून माओवादी चळवळीतील त्याचे संघटनेतील अनेकांशी सूर जुळेनासे झाले होते. सशस्त्र संघर्ष संपवून संवादाचा मार्ग स्वीकारा, अशी भूपतीची भूमिकाच संघटनेला न पटल्याने अखेर त्याने स्वतःचा मार्ग वेगळा निवडला, अशी चर्चा सुरू झाली आहे.

संघटनेचा महासचिव थिप्पारी तिरुपती ऊर्फ देवजी याने लढा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली, मात्र भूपतीने शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू, घटता जनाधार आणि जंगलातील अनिश्चितता पाहून जनयुद्ध आता निरर्थक ठरले, असा निष्कर्ष काढत आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. भूपती आणि त्याचा गट सध्या पोलीस संरक्षणाखाली आहेत. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेंतर्गत त्यांना सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे.

गडचिरोली होणार माओवादमुक्त

जानेवारी २०२५ मध्ये भूपतीची पत्नी व केंद्रीय समिती सदस्य विमला सिडाम उर्फ तारक्काने फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर अनेक जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करत शस्त्र सोडून हाती संविधान घेतले. तथापि, भूपती देखील शरणागतीच्या तयारीत असल्याची चर्चा होती. अखेर त्याने ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. त्यामुळे घनदाट जंगलात चार दशकांपासून टिकून असलेल्या माओवादी चळवळीचा हा शेवटचा टप्पा ठरू शकतो. यामुळे गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. भूपतीसाठी १० कोटींहून अधिक रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तो महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओदिशा आदी राज्यांत मोस्ट वाँटेड होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

भाजप नेत्याची हत्या

दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांनी भाजप नेत्याची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकमधील मुंजाल कांकेर येथे ही घटना घडली. भाजप नेता सत्यम पुनेमची मध्य रात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. भाजप नेत्याच्या मृतदेहाजवळ माओवादी एक पत्रक ठेवून गेले होते. सत्यम पुनेम हे खबरी असल्याचा संशय माओवाद्यांना होता. ते गावात होत असलेल्या कारवायांची माहिती पोलिसांना पुरवत होते, असाही माओवाद्यांना संशय होता. त्यामुळेच त्यांनी भाजप नेत्याला संपवले. या घटनेनंतर मद्देड एरिया कमिटीने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

logo
marathi.freepressjournal.in