जालन्यातील मराठा आंदोलन चिघळलं ; पोलिसांकडून लाठीचार्ज तर आंदोलकांकडून दगडफेक

पोलिसांकडून या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे.
जालन्यातील मराठा आंदोलन चिघळलं ; पोलिसांकडून लाठीचार्ज तर आंदोलकांकडून दगडफेक

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरुअसलेल्या आंदोलन्यादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. तसंच या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगड फेक देखील करण्यात आली आहे. या दगडफेकीत पोलिसांसह आंदोलक देखील जखमी झाले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासह इतर मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. दरम्यान, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंबड तालुक्यातील २२ गावांमध्ये बंद पाळण्यात आला. तसंच बीडच्या गेवराई तालुक्यातील अनेक गावांनी बंद पुकारुन या आंदोलनाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटी गावापर्यंत दुचाकी रॅली काढली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु करण्यात आलं. यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलद्वारे मनोज जरांगेंशी संवाद साधत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा आंदोलन संदर्भात सकारात्मक पाऊले टाकत असल्याचं सांगितलं होतं.

यावेळी जरांगे यांनी आतापर्यंत आश्वासनांशिवाय काहीचं हाती पडत नसल्याचं सांगत उपोषणावर ठाण राहण्याच निर्णय घेतला होता. यानंतर चौथ्या दिवशी मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण सुरु आहे. उपोषण कर्त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी सरकारचे गुरुवार रात्रीपासूनच प्रयत्न सुरु आहेत. शुक्रवारी दुपारीही मोठ्या प्रमाणावर फोजफाट्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांना उपचार घेण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in