"हे निव्वळ निवडणुकांसाठीचे गाजर", राज्य सरकारच्या अध्यादेशावर किरण माने यांची प्रतिक्रिया

मनोज जरांगेंच्या मागणीनुसार सगेसोयऱ्यांना आणि नातलगांना आरक्षण देऊन १०० टक्के समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीत घालण्याचा सरकारचा आणि मनोज जरांगे यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे असं दिसतंय. परंतु, थोड्याच दिवसांत दूध का दूध आणि...
"हे निव्वळ निवडणुकांसाठीचे गाजर", राज्य सरकारच्या अध्यादेशावर किरण माने यांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. राज्य सरकारने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या असून त्याबाबतचा अध्यादेशही काढला आहे. मात्र, या अध्यादेशावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकत्याच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठा समाजबांधवांना "तहात हारु नका", असे आवाहन केले आहे. तसेच, हे निव्वळ निवडणुकांसाठीचे गाजर असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश जारी केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. यानंतर राज्यभरातील मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. तर राज्यातील अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा अध्यादेश नाही, हा मसुदा असल्याचे म्हटले. आता किरण माने यांनी यावर केलेली पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी-

'मराठा बांधवांनो, तहात हारू नका. "...सदर अध्यादेश 16 फेब्रूवारी 2024 पासून किंवा त्यानंतर लागू होईल." आणि "...यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील." हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे. निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा. एक मराठा लाख मराठा', असे म्हणत किरण माने यांनी सरकारने काढलेल्या अध्यादेशावर प्रश्न उपस्थित करत मराठा समाजाला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

थोड्याच दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल- प्रकाश शेंडगे

तर सरकारच्या आजच्या अध्यादेशावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मनोज जरांगेंच्या मागणीनुसार सगेसोयऱ्यांना आणि नातलगांना आरक्षण देऊन १०० टक्के समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीत घालण्याचा सरकारचा आणि मनोज जरांगे यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे असं दिसतंय. परंतु, थोड्याच दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल", असे शेंडगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकारने जारी केलेला आजचा अध्यादेश हा खरोखर मराठा समाजाची फसवणूक आहे का? याबाबत चर्चा होताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in