राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा परत एकदा चांगलाच पेटला आहे. सरकारला ४० दिवस देऊनही अजून ठोस असा निर्णय मिळाला नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा नव्याने अंदोलन, प्रचार चालू झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केलं होते. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज सकाळी सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्यांच्यावतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्च्याची ही रॅली पोवई नाका येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे नगरपालिका, राजपथ, मोतीचौक, गोलबाग मार्गे पाचशे एक पाठी, पोलीस मुख्यालय, पोवई नाका मार्गे जिल्लाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीनंतर मराठा बांधव उपोषण साखळीत सहभागी झाले.
यावेळी 'एक मराठा लाख मराठा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी जय शिवाजी', 'बगताय काय सामील व्हा' अशा अनेक घोषणांनी मराठा बांधवानी उपोषणाचा परिसर दणाणून टाकला होता.
मरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला होता. काल हा वेळ संपला तरी देखील सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. यामुळे जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसंच जागोजागी मोर्चे, आंदोलने, उपोषणे, रॅली काढून जरांगे यांना समर्थन देण्यात येत आहे.