वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय; भपकेबाज विवाहांना लगाम, नवी आचारसंहिता जाहीर

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने हादरलेल्या मराठा समाजाने अखेर लग्नातील उधळपट्टी, हुंडापद्धती व भपकेबाज चालीरीतींवर कठोर निर्णय घेतला आहे. पुण्यात बुधवारी झालेल्या बैठकीत मराठा समाजाने नवीन विवाह आचारसंहिता जाहीर करत, समाजातील लग्नसमारंभांत काटकसर, साधेपणा व जबाबदारी यांचा अवलंब केला जाईल, असा निर्धार केला.
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय; भपकेबाज विवाहांना लगाम, नवी आचारसंहिता जाहीर
Published on

पुणे : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने हादरलेल्या मराठा समाजाने अखेर लग्नातील उधळपट्टी, हुंडापद्धती व भपकेबाज चालीरीतींवर कठोर निर्णय घेतला आहे. पुण्यात बुधवारी झालेल्या बैठकीत मराठा समाजाने नवीन विवाह आचारसंहिता जाहीर करत, समाजातील लग्नसमारंभांत काटकसर, साधेपणा व जबाबदारी यांचा अवलंब केला जाईल, असा निर्धार केला.

या बैठकीचे आयोजन प्राची दुधाने, विकास पासलकर, विराज तावरे, प्रशांत धुमाळ यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते. बैठकीला इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, अ‍ॅड. पूजा झोळे, प्रशांत जगताप, अंकुश काकडे, राहुल पोकळे आदींसह राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग होता.

मराठा समाजातील भपकेबाज विवाहप्रथांवर नाराजी व्यक्त करत, महिलांचे हुंडाबळी जात असल्याचे निदर्शनास आले. प्री-वेडिंग शूट, डेस्टिनेशन वेडिंग, अनावश्यक खर्च हे टाळण्याचे ठरवले आहे.

अशी आहे आचारसंहिता

  • हुंडा न देणे, न घेणे.

  • हुंडा घेणाऱ्या कुटुंबांशी रोटी-बेटी व्यवहार बंद; समाजातून बहिष्कार.

  • सासरी छळ होणाऱ्या महिलांच्या पाठीशी ठाम उभे राहणे.

  • विवाह सोहळा साधेपणाने, वेळेवर आणि अत्यंत मर्यादित खर्चात पार पाडणे.

  • मानपान, जावईमान यांचे सामाजिक प्रदर्शन टाळणे.

  • सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन.

  • पाहुण्यांची मर्यादा.

  • अनावश्यक खर्च टाळून एफडी व गरजवंतांना मदत.

  • डीजे, फटाके व भडक नृत्यांवर बंदी.

  • प्री-वेडिंग शूटवर बंदी.

  • खर्च वधू व वर पक्षाने समान वाटून घ्यावा.

समाजात जनजागृतीसाठी समित्या नेमणार

विवाह आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी प्रत्येक गावपातळीवर समित्या नेमल्या जातील. या समित्यांमध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वार्थ नसलेले प्रामाणिक व जबाबदार लोक असतील. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास ही समिती मध्यस्थी करून तोडगा काढेल. तरुण-तरुणींसोबत व महिलांसोबत स्वतंत्र चर्चा करून त्यांच्यासाठीही विशेष मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in