Maratha Reservation :मराठा आंदोलनाची मराठवाड्यात धग ;तहसिलदारांची गाडी फोडली, बसेसवर दगडफेक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कल्याणमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला.
Maratha Reservation :मराठा आंदोलनाची मराठवाड्यात धग ;तहसिलदारांची गाडी फोडली, बसेसवर दगडफेक
Published on

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची रविवारी मराठवाड्याला झळ बसली. जालना येथे महिला तहसिलदाराच्या गाडीची संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली. तर नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तापले आहे. बसेसवर दगडफेकीच्या घडना घडल्याने एसटी महामंडळाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह विभागातील हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चारही जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील रामनगर येथे तहसीलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली. बाजीउम्रद येथील मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून ही गाडी फोडण्यात आली आहे. तहसीलदार यांनी चर्चेसाठी गावात येण्याची गावकऱ्यांची मागणी होती. त्यानंतर रामनगर येथे आंदोलकांकडून रस्ता रोको देखील करण्यात आला आहे. आंदोलनस्थळा जवळून जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

शनिवारी रात्री बीड जिल्ह्यात महामार्ग राखण्यात आला होता. त्यानंतर रविवारीही आंदोलनाची धग कायम राहिली. बीड आणि नांदेडमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली. बीडहून कल्याणकडे जाणारी एसटी बस चराटा फाट्याजवळ आली असता, यावेळी आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरवून या बसवर तुफान दगडफेक केली. यामध्ये बसच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत. तर दुसऱ्या घटनेत नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञातांनी एसटी बसेसवर दगडफेक केली. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील या घटना पाहता एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून एसटी बसेस रद्द केल्या आहेत. परभणी आणि हिंगोली दोन जिल्ह्यातील एकूण ७ आगारातील ३८० बसेसच्या २८०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास ३५० बसेस जागेवर उभ्या आहेत.

कल्याणमध्ये बावनकुळेंना काळे झेंडे दाखवले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कल्याणमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला. तसेच बावनकुळे यांच्याविरोधात जोरदार घोषणेबाजी केली. काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

logo
marathi.freepressjournal.in