जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असतानाच शनिवारी जालन्याच्या वडीगोद्री येथे मराठा व ओबीसी आंदोलक एकमेकांपुढे उभे ठाकले. यावेळी दोन्ही समुदायांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी ऐनवेळी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. शनिवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता.
सलगच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके व त्यांच्या न समर्थकांनी अंतरवाली सराटीपासून काही अंतरावरच असणाऱ्या वडीगोद्री येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. व त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोधक केला आहे. त्यांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया उमटत असतानाच त्यांच्या आंदोलन स्थळापासून काही अंतरावर शनिवारी मराठा व ओबीसी आंदोलक एकमेकांसमोर उभे ठाकले.
दोन्ही समुदायांनी एकमेकांविरोधात घोषणा सुरू केल्याने स्थिती चिघळण्याची शक्यता असतानाच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्यांना पांगविल्याने पुढील अनर्थ टळला. वडीगोद्री येथून मनोज जरांगे समर्थकांच्या गाड्या जात होत्या, त्यावेळी आमच्या गाड्या का अडवून ठेवल्या, तुम्ही मराठा समाजाच्याच गाड्या कशा सोडता, असे सवाल उपस्थित करून ओबीसी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांमध्ये काही महिलांचाही समावेश होता.
वडीगोद्रीतील आंदोलनामागे भुजबळ
दुसरीकडे, मनोज जरांगे-पाटल यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ व परळीतील माणसांमुळे वडीगोद्री येथे ओबीसींनी आंदोलन सुरू केल्याचा आरोप केला आहे. मी इकडे मरणाच्या दारात बसलो आहे. समाजबांधवांनी माझ्या समर्थनार्थ पुकारलेला बंद शांततेत पार पाडावा, मी अजून खंबीर आहे. पण तूर्त संयम राखा, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री-जरांगेंवर हाकेंची टीका
दुसरीकडे, लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर जोरदार पलटवार करताना म्हटले आहे की, मनोज जरांगे यांनी अभ्यास न करता बोलू नये. ते मनोरुग्ण आहेत, त्यांनी आपल्या ६ आंदोलनांत ६ वेगवेगळ्या मागण्या केल्या. मुख्यमंत्री सर्वच जातीधर्मांना सोबत घेऊन चालण्याचे काम करतात. पण हे मुख्यमंत्री केवळ जरांगे यांच्याच तालावर नाचतात. ते केवळ मराठ्यांचे ऐकतात, दुसरे कुणाचेही नाही, असेही हाके म्हणाले.
शिंदे २ क्रमांकाच्या टोळीचे नेते
मुख्यमंत्र्यांना धनगरांना एसटी आरक्षण देण्यासंबंधी जीआर काढण्याचा अधिकार नाही. हा अधिकार संसदेचा आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने एक पत्र जाते. त्यानंतर त्याला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर हे आरक्षण मिळेल. या प्रकरणी सरकार जेवढे जीआर काढेल तेवढे ते अवैध ठरतील. याप्रकरणी कुणीही कोर्टाने दिलेले निकाल वाचण्याचे कष्ट घेत नाही. पण कुणी आंदोलन केले की लगेच समिती नेमली जाते, असे हाके म्हणाले. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या अॅटर्नी जनरल यांचे ऐकणार नसतील तर तो घटनेशी द्रोह आहे. एकनाथ शिंदे हे २ क्रमांकाच्या टोळीचे नेतृत्व करतात, एका जातीचे काम करतात, असा आमचा थेट आरोप आहे, असेही ते म्हणाले.
शरद पवार महाजातीयवादी
शरद पवारांची आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी जबाबदारी आहे. ते मुख्यमंत्री होते, पण अनेक पदे केवळ घरातल्या लोकांनाच दिली. मंडल आयोग लागू होताना ते मुख्यमंत्री होते. त्यासंबंधीचा कायदा आधी महाराष्ट्रात पारित झाला. त्यानंतर तो इतर राज्यांनी पारित केला. त्यामुळे पवारांनी स्वतः पुढे येऊन आरक्षण हे मागासवर्गीयांचे आहे असे म्हणण्याची गरज आहे. पण असे होताना दिसत नाही. पवार कुटुंबातील सदस्य रात्री-अपरात्री जाऊन मनोज जरांगे यांना भेटतात. पण ओबीसींच्या आरक्षणावर अवाक्षरही काढत नाहीत. त्यामुळे शरद पवार महाजातीयवादी असल्याचे स्पष्ट होते, असे हाके म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांवर साधला निशाणा
लक्ष्मण हाके यांनी यावेळी जरांगेंना भेटणारे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात ओबीसी राहतात की नाही हे माहिती नाही. ते जरांगेंना जाऊन भेटतात. पण आमच्याविषयी काहीही बोलत नाहीत. राहुल गांधी बोलतात, ते जातनिहाय जनगणनेचीही मागणी करतात. पण त्यांचे येथील नेते ओबीसींवर बोलत नाहीत. त्यामुळे आम्ही राहुल गांधींकडे भेटीची वेळ मागितली आहे.