जरांगेंना विरोध केला म्हणून डॉक्टरला फासलं काळं, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं?

मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता. त्यामुळं रमेश तारख यांना मराठा संघटनांनी काळे फासले.
जरांगेंना विरोध केला म्हणून डॉक्टरला फासलं काळं, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं?
Published on

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं गेल्या काही काळापासून आंदोलन सुरु आहे. त्याचवेळी लक्ष्मण हाके यांनी ओसीबी आरक्षण बचावसाठी जालन्यातील वडिगोद्री येथे उपोषण केलं होतं. सरकारच्या हस्तक्षेपानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन १३ जुलैपर्यंत स्थगित केलं आहे. तर सरकारनं मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं जाणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडलं आहे. सध्या या दोघांनी उपोषण मागे घेतलं असलं, तरी या आंदोलनाचे परिणाम राज्यभरात उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या एका डॉक्टरांना काळं फासल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आधी सत्कार मग फासलं काळं...

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळं डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली. माध्यमांमधील माहितीनुसार, मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता. त्यामुळं रमेश तारख यांना मराठा संघटनांनी काळे फासले. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. विशेष म्हणजे या संघटनेनं रमेश तारख यांचा आधी सत्कार केला, त्यानंतर त्यांना काळं फासलं. संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेनं तणाव वाढण्याची शक्यता आहे.

ओबीसी नेत्यांशिवाय कुणीही गावात प्रवेश करू नये, अन्यथा...

गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक गावांमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीनं सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. आता लक्ष्मण हाकेंच्या उपोषणानंतर काही गावांमध्ये गावबंदीचे पोस्टर लावल्याचं समोर आलं आहे. परंतु या गावांमध्ये ओबीसी नेत्यांना सोडून इतर सर्व नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. जालन्यातील परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात आणि परभणीच्या मोहाडी, तालुका जिंतूर गावात फक्त ओबीसी नेत्यांनाच प्रवेश अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. या बॅनरवर "एकच पर्व, ओबीसी सर्व...ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यानं गावात प्रवेश करू नये. अन्यथा मोठा अपमान केला जाईल," असा उल्लेख होता.

logo
marathi.freepressjournal.in