सुजीत ताजने / छत्रपती संभाजीनगर
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठा समाजबांधव दाखल झाले आहेत. परंतु कुणीही भुकेला राहू नये यासाठी मराठवाड्यातील गावोगावी ग्रामस्थांनी माणुसकीचा परिचय देत अनोखी मोहीम सुरू केली आहे. बीडसह संभाजीनगर जिल्ह्यांतून आंदोलकांसाठी भाकरी, चटणी, बेसन व शिदोरी गोळा करून थेट मुंबईत पाठविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आझाद मैदान परिसरातील हॉटेल्स आणि दुकाने बंद असल्याने उपोषणकर्त्यांसोबत दाखल झालेल्या लाखोंच्या संख्येतील आंदोलकांची उपासमार होत असल्याचे लक्षात येताच ही मोहीम हाती घेण्यात आली. बीड तालुक्यातील गुंदावाडी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आणि आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणावर भाकरी गोळा करण्यास सुरुवात झाली.
हजारो भाकरींसह जवळपास ४०० किलोमीटरवरून आंदोलकांसाठी अन्न पुरविण्याची ही घटना इतिहासात पहिल्यांदाच घडत असून, माणुसकीचे दुर्मिळ दर्शन घडले आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो समाज बांधव मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या राहण्याची खाण्याची गैरसोय होत आहे. आता बीड जिल्ह्यातील पन्नास गावकऱ्यांनी पाच लाख भाकरी, ठेचा, चटणी आणि लोणचे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत मुंबईमधील आंदोलकांना जेवणाची गैरसोय होऊ नये, म्हणून बीडमधील गाव खेड्यातील मराठा समाज बांधवांनी हा निर्णय घेतला असल्याचे येथील स्थानिक महिलांनी सांगितले.
गाड्या भरून शिदोरी मुंबईकडे रवाना
गावागावांतून दवंडी देऊन महिलांनी घरीच भाकरी थापल्या. सकाळपासूनच गाड्या भाकऱ्यांनी भरून मुंबईच्या दिशेने निघाल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सरकारकडून आझाद मैदान परिसरातील खाऊगल्ली बंद करून आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न उलटाच पडल्याचे दिसत आहे. मराठा समाजबांधव गावोगावी एकजुटीने उभा राहत असून "कोणीही उपाशी राहणार नाही" हा निर्धार जिवंत झाला आहे. बीड, वडवणी, माजलगाव, गेवराईसह इतर तालुक्यांतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
इतिहासात नोंद होणारा अनोखा उपक्रम
आरक्षणासाठी लाखो मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. अशा वेळी गावोगावी ग्रामस्थांनी आंदोलकांच्या पोटाची खळगी भरून देण्यासाठी दाखवलेली ही बांधिलकी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. सामाजिक एकजूट, परस्परांवरील आपुलकी आणि माणुसकीचा हा उपक्रम मराठा समाजाच्या लढ्यातील नवीन बळ ठरत आहे.