
मुंबई : राज्यभरातून मराठा आंदोलक आझाद मैदान येथे दाखल झाले आहेत. मात्र, मुंबई महापालिकेने आंदोलकांसाठी तोकडी सुविधा पुरवल्याने आंदोलक संतप्त झाले होते. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना इशारा दिल्यानंतर प्रशासन आंदोलकांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी सरसावली आहे. महापालिकेच्या वतीने आझाद मैदान आणि समोरील रस्त्यावर २३६ पोर्टेबल फिरती शौचालये बसविण्यात आली आहेत, तर ११ पाण्याचे टँकर्स उपलब्ध केले आहेत. यामुळे आंदोलकांची तात्पुरती सोय झाली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मराठा आंदोलकांना शौचालय, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, धूर फवारणी अशा विविध सुविधा पुरविण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाचे कर्मचारी कामाला - लागले. आझाद मैदानावर राज्यभरातून आलेल्या मराठ्यांची शुक्रवारी पिण्याच्या पाण्याअभावी, शौचालयांअभावी प्रचंड गैरसोय
झाली होती. त्यांना पाण्याची बॉटल विकत घेऊन पाणी प्यावे लागल्याची परिस्थिती होती. यामुळे त्यांनी सरकारविरोधात मोठा संताप व्यक्त केला होता. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीसुद्धा याविरोधात सरकारला धारेवर धरत आयुक्तांना इशारा दिला होता. यानंतर पालिकेने सुविधा पुरविण्यास सुरुवात केल्याची माहिती आंदोलकांनी दिली. मराठा
मराठा आंदोलकांची शुक्रवारी झालेली गैरसोय शनिवारी होऊ नये, म्हणून महापालिकेने पोर्टेबल टॉयलेट ११ पाण्याचे टँकर, आझाद मैदान आणि रस्त्यावर सफाईसाठी बी, सी आणि ई विभागातील सुमारे १०० कामगार तैनात केले होते. तसेच आलेल्या आंदोलकांची आरोग्याच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय कक्षाच्या ४ टीम, २ रुग्णवाहिका, २ धूर फवारणी आदींची सुविधा करून दिली. यामुळे शनिवारी मात्र मराठा आंदोलकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला.
महापालिकेने पुरविल्या सुविधा
२३६ पोर्टेबल टॉयलेट
सफाईसाठी १०० कामगारांची टीम तैनात
आझाद मैदानात विजेची सुविधा
४ वैद्यकीय कक्षाची टीम तैनात
२ रुग्णवाहिका उपलब्ध
मैदानातील चिखलावर खडीचा मारा
११ पाण्याचे टँकर्स
२ कीटकनाशक धुम्रफवारणी टीम
आझाद मैदानातील चिखलावर खडी
आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात झालेल्या चिखलाच्या साम्राज्यावर महापालिकेने २ टन खडी ओतले. तसेच मैदानात झालेला काळोख दूर करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून विजेची सोयसुद्धा केली. याबरोबर मैदानातील आंदोलकांना मच्छर, डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सतत कीटकनाशक धुम्रफवारणी करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त व्यवस्था
मुंबई महापालिकेने आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे ११ टँकर्स उपलब्ध केले आहेत. अतिरिक्त टँकर्स मागविले आहेत. आंदोलन स्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी समर्पित कर्मचारी तैनात आहेत. वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे.