आरक्षणापेक्षा सत्ताधारी, विरोधकांचेही टार्गेट मुख्यमंत्रीच; आंदोलकांना फूस महायुतीतील मराठा नेत्यांचीच

मुंबईच्या आझाद मैदानात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कात्रीत सापडल्याचे दिसत आहेत. आरक्षणापेक्षा सत्ताधारी, विरोधकांचेही मुख्यमंत्रीच टार्गेट असल्याचे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे.
आरक्षणापेक्षा सत्ताधारी, विरोधकांचेही टार्गेट मुख्यमंत्रीच; आंदोलकांना फूस महायुतीतील मराठा नेत्यांचीच
Published on

एस. बालकृष्णन/मुंबई:

मुंबईच्या आझाद मैदानात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कात्रीत सापडल्याचे दिसत आहेत. आरक्षणापेक्षा सत्ताधारी, विरोधकांचेही मुख्यमंत्रीच टार्गेट असल्याचे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे.

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सध्या सुरू असलेल्या जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला राज्यातील मोठ्या मराठा नेत्यासह महायुतीतील काही मराठा नेते गुपचूप साथ देत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीपेक्षा फडणवीस यांना पायउतार करण्याचीच सत्तेतील व विरोधकांतील नेत्यांची इच्छा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून महाविकास आघाडी सरकार पाडल्याची शिक्षा फडणवीस यांना करायची आहे. शनिवारी 'फ्री प्रेस जर्नल' व 'नवशक्ति'शी बोललेल्या अनेक आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा खरा निशाणा फडणवीसच आहेत. स्वतः फडणवीस यांनीही म्हटले की, काही लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जरांगे-पाटलांच्या खांद्याचा वापर करत आहेत.

सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांना दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावणाऱ्या आंदोलनकर्त्यांना परतून कसे लावावे, याबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस गोंधळलेले दिसतात. जरांगे-पाटील यांच्या समर्थकांना आंदोलकांना मुंबईत आंदोलनाची परवानगी देऊन त्यांनी मोठी चूक केली. आता जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत हजारो समर्थक आहेत. जरांगे-पाटील यांना गावाला परत कसे पाठवायचे हे फडणवीस यांना सुचेनासे झाले आहे. कारण जरांगे-पाटील हे पाणी पिण्यासही नकार देत आहेत. त्यामुळे मंत्रालयात प्रचंड चिंतेचे वातावरण आहे.

त्यातून मंत्रालयाला घेराव घालणे हेच आंदोलकांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट होते. भगव्या पट्ट्या बांधलेले आंदोलनकर्ते वेगवेगळ्या मार्गांनी मंत्रालयाकडे जात होते आणि पोलिसांनी त्यांना अडवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. यापूर्वी हायकोर्टाच्या आदेशामुळे आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानाबाहेर जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. शनिवारी मात्र हायकोर्टासमोरसुद्धा रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी पोलिसांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती. एक वाहनचालक सहदेव मेहताने विचारले की, "मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणवते, पण शहराच्या मध्यवर्ती भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा मागमूस नाही."

शनिवारी जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले की, मागणी मान्य झाल्याशिवाय ते आणि त्यांचे समर्थक आझाद मैदान सोडणार नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर "भ्रम पसरवण्याचा" आरोप केला. "मी कधीही म्हटलेले नाही की ओबीसींना असलेला १० टक्के आरक्षणाचा हिस्सा मराठ्यांसाठी कमी करावा. माझी एकच मागणी आहे की, कुणबींना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे, ज्यामुळे आरक्षण आपोआप मिळेल," असे त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी लाखो मुंबईकरांना ओलीस ठेवण्यात आले. प्रशासनाने परिस्थिती सुरळीत करण्यासाठी काहीही केलेले नाही. सोमवारपासून कार्यालये सुरू झाल्यानंतर संपूर्ण शहरात प्रचंड वाहतूककोंडी होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

पोलिसांनी आंदोलकांसमोर शरणागती पत्करली आहे का?

पोलिसांनी मराठा आंदोलनकर्त्यांसमोर शरणागती पत्करली आहे का? की त्यांना जाणीवपूर्वक सैल सोडले आहे? आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात ठिय्या मांडलेल्या हजारो आंदोलनकर्त्यांच्या गोंधळाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे, अशी चर्चा सध्या मुंबईत सुरू आहे. सरकार हतबल झालेले पाहून आंदोलनकर्ते शनिवारी आक्रमक झाले. 'फ्री प्रेस जर्नल'च्या प्रतिनिधींनी दुपारी आझाद मैदानाचा दौरा केला. तेव्हा तिथे पूर्ण कायदाशून्यता दिसली. 'अंजुमन-ए-इस्लाम' शाळेसमोर वाहने अडवून कारचालकांना गाड्या मागे वळवण्यास भाग पाडले जात होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आणलेल्या शेकडो गाड्या डी. एन. रोड व इतर महत्त्वाच्या रस्त्यांवर उभ्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ बेस्ट बसमधील प्रवाशांना उतरवून चालकांना ती मंत्रालयात घेऊन जाण्यास सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in