जरांगे पाटील जिंकले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले; आता...

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करीत मध्यरात्री अध्यादेश देखील काढला.
जरांगे पाटील जिंकले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले; आता...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाची हाक देत असंख्य मराठा बांधवांसह आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देण्याची जरांगेंची महत्त्वाची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास आझाद मैदानाकडे निघू असा इशारा जरांगेंनी शुक्रवारी संध्याकाळी दिला होता. त्यानंतर मध्यरात्रीच जवळपास तीन तासांच्या चर्चेनंतर राज्य सरकारने जरांगेच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे जरांगे आता मुंबईला न येता नवी मुंबईच्या वाशी येथूनच आंतरवाली सराटीला परतणार आहेत.

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करीत मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. त्यानंतर "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमची विनंती मान्य करण्यात आली आहे. आम्ही त्यांचे पत्र स्वीकारू. मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिणार आहे" असे जरांगे यांनी मध्यरात्रीच पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.

त्यानुसार, आज सकाळी 10 च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन सरकारचा अध्यादेश जरांगे पाटील यांच्या हाती दिला. मग, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत पिऊन जरांगेंनी उपोषण सोडले. यावेळी क्रेनमधून मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवरायांना पुष्पहारही अर्पण करण्यात आला.

आता आंतरवाली सराटीकडे माघारी जाणार

आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचीही मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती. ही मागणीही मान्य झाली आहे.विजयी गुलाल उधळण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात जाईल असे जरांगेंनी आधी जाहीर केले होते. मात्र, आता ते पुन्हा आंतरवाली सराटीकडे माघारी फिरणार आहेत. त्याआधी ते वाशी येथे सभा घेऊन आपली भूमिका थोड्याचवेळात स्पष्ट करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in