...तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू : जरांगे-पाटील यांचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलन होणार आहे.
...तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू : जरांगे-पाटील यांचा इशारा

उमेश पठाडे / छत्रपती संभाजीनगर

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मैदानाची पाहणी करण्यासाठी मराठा समाजातील काही पदाधिकारी शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी करून गेले. असे असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना थेट राज्यातील सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत राज्य सरकारला आंदोलकांच्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या न रोखण्याचे आवाहन केले आहे. जर ट्रॅक्टर अडवलेच, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आम्ही सगळे जाऊन बसू. नागपूरच्या आणि मुंबईच्या त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलनाला बसू. देवेंद्र फडणवीस यांच्या दारातच जाऊन बसायचं. करोडोंच्या संख्येने जाऊन बसायचं, उठायचंच नाही. ट्रॅक्टर अडवाच तुम्ही. कसे गुन्हे दाखल करता तेच बघूया, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

"माझा उद्देश एकच आहे की, आमरण उपोषण करणे आणि त्या माध्यमातून गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देणे. मरेपर्यंत मागे फिरणार नाही. माझं ध्येय आणि उद्देश ठरलेले आहे. त्यापासून आपण दूर जाणार नाही," असे जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना म्हटले. तसेच जरांगे-पाटलांनी मराठा समाजालाही विनंती करत मुंबईतील मोर्चात सहभागी होण्यास सांगितले. "सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की एकत्र या. असतील नसतील तिथून मुंबईत या. पुरे झाले आता. गोरगरीबांच्या पोरांचं कल्याण होईल," असे जरांगे-पाटील म्हणाले.

अडवण्याचा प्रयत्न करू नये-

'दिशा मुंबईची, ध्येय मराठा आरक्षणाचे' अशा शब्दांमध्ये मनोज जरांगे-पाटलांनी काहीही झाले तरी आपण मुंबईतील उपोषणासाठी जाणार, असे म्हटले आहे. अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने २० जानेवारी रोजी मनोज जरांगे-पाटील यांचा मोर्चा निघणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटलांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठ्यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी दिली नाही, तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करू. जागा मिळेल तिथे आंदोलन करू. सरकारने आम्हाला अडविण्याचा प्रयत्न करू नये, असे जरांगे-पाटील थेट फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in