मराठा आरक्षण राजकारण्यांच्या तावडीत; मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी - शरद पवार
पुणे/मुंबई : राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच आता सर्वपक्षीय नेत्यांनी यावरून काथ्याकूट सुरू केल्याने हा प्रश्न राजकारण्यांच्या तावडीत सापडला आहे. सर्वात जुनेजाणते नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा पेच सोडवण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे, ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्यासह इतर सर्व नेतृत्वांना या बैठकीला बोलवावे. तसेच राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांनाही या बैठकीचे निमंत्रण द्यावे, अशी सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे. मात्र, ‘राजकारण्यांकडून फक्त टोलवाटोलवी सुरू आहे. आरक्षण कधी द्यायचे, हे सत्ताधाऱ्यांना पक्के माहीत आहे’, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी राजकारण्यांवर प्रहार केला आहे.
शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी सोमवारी मराठा ठोक मोर्चाने धडक देत मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यावेळी मराठा नेते रमेश केरे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यामध्ये राजकीय पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांना बोलवावे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह इतर नेतृत्वांना या बैठकीला आमंत्रित करावे. या बैठकीत एकमताने जो काही निर्णय होईल, त्याला आमचा पाठिंबा असेल.”
“आरक्षणाबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सर्वपक्षीय बैठकीला त्यांनी मनोज जरांगे यांच्यासह ओबीसी नेत्यांनाही बोलावले पाहिजे. ओबीसींचे नेतृत्व करणारे मंत्री छगन भुजबळ तसेच इतर सहकाऱ्यांनाही बोलवावे. त्या संयुक्त बैठकीतून चर्चा करून आम्ही मार्ग काढू,” अशी सूचना शरद पवारांनी केली आहे.
आरक्षण मर्यादा वाढवण्याचा अधिकार केवळ केंद्राला
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. केंद्राने हे धोरण बदलले पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने धोरण बदलण्याची भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका असेल. राज्यातील सामाजिक वातावरण चांगले राहण्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. दोन समाजात कटुता येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
..तेव्हा आले नाहीत - मुख्यमंत्री
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची सूचना आता शरद पवार यांनी केली. मात्र, जेव्हा आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावली, तेव्हा विरोधक आले नाहीत. येणार, येणार म्हणत असताना आले नाहीत. निवडणुका येतात, जातात, पण असे वातावरण असणे योग्य नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे - बावनकुळे
मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मविआने सत्तेत असताना का प्रयत्न केले नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी खो घातला. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी ठाकरे यांची होती. ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
एकत्र बसण्याची गरज काय? - मनोज जरांगे
एकत्र बसण्याची गरज काय आहे? सरकारला माहिती आहे की आरक्षण कुठे आहे. सरकारला हे देखील माहिती आहे की फक्त बैठका आणि चर्चा कधीपर्यंत चालवायच्या. हे बैठकीला आले नाही आणि ते बैठकीला आले नाही, अशा प्रकारची ढकलाढकली कधीपर्यंत? मराठा आणि कुणबी एकच आहे. हे सर्वांना माहिती आहे, मग एकत्र बसण्याची काय गरज आहे?, असा सवाल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.