मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटील यांना सरकारचे चर्चेचे आवाहन

मराठ्यांच्या आरक्षणासाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करून मुंबईत आंदोलन पुकारण्यावर ठाम असलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यापूर्वी सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. नव्याने आंदोलन आणि उपोषण करण्यापेक्षा जरांगे यांनी पेन-कागद घेऊन सरकारशी चर्चेला यावे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मराठ्यांच्या आरक्षणासाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करून मुंबईत आंदोलन पुकारण्यावर ठाम असलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यापूर्वी सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. नव्याने आंदोलन आणि उपोषण करण्यापेक्षा जरांगे यांनी पेन-कागद घेऊन सरकारशी चर्चेला यावे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

कारवाईचा इशारा

जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन पुकारणार असल्याचे जाहीर केले असून त्यासाठी ते अंतरवाली सराटी येथून २७ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहनही केले आहे. मात्र कोणी बेकायदेशीर आंदोलन केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कॅबिनेट उपसमितीची पुनर्रचना केली असून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना समितीचे अध्यक्षपद दिले आहे. मात्र मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारने पुनर्रचित केलेली मंत्रिमंडळ उपसमिती म्हणजे पोळ्याच्या दिवशी केलेला खांदेबदल आहे. उपसमिती आणि आमच्या मागण्या हे वेगळे विषय आहेत, असे जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. उपसमिती हे पूर्वीचेच खूळ असून त्यामध्ये नवीन काही नाही. दुपारी नांगरांचे बैल बदलावेत तसे हे आहे. हा झाला की तो याप्रमाणे नांगरांचे बैल बदलले जातात. आता पोळ्याच्या दिवशी उपसमितीमध्ये खांदे बदलले आहेत. आमच्या मागण्याच सरकारच्या डोक्यात येत नाहीत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, जरांगे यांनी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केल्यापासून ओबीसी समाजातील नेतेही सक्रिय झाले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके तसेच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी घटकांतील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून ओबीसी समाजाचे ऐक्य कसे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जागर लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक रोड येथे लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांचा सुसंवाद, परिसंवाद, खुले चर्चासत्र, मार्गदर्शन व सन्मान सोहळा असा कार्यक्रम छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात भुजबळ यांनी ओबीसी समाजापुढील आव्हानांचीही मांडणी केली. ओबीसी समाजामध्ये रोटी-बेटी व्यवहार वाढवून आपसांत ऐक्य प्रस्थापित केले पाहिजे. तंत्रज्ञान, जागतिकीकरण, आर्थिक परिवर्तन यांना तोंड द्यावे लागत असल्याने शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही. फक्त पदव्या घेऊन चालणार नाही. जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून उच्चपदावर काम करावे लागेल, असे भुजबळ यांनी सांगितले.

जातगणना राबवा

टाइपरायटर गेले आणि कॉम्प्युटर आले. प्रत्येकाला कॉम्प्युटर लागतो. डॉक्टर, इंजिनिअर आणि शेतकऱ्यालाही कॉम्प्युटर लागतो. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्म एकत्र आणण्याचे कार्य केले. देशात आदिवासी, ओबीसींसह विविध समाजातील साडेसहा हजार जाती आहेत. मात्र, ओबीसींची स्वतंत्र जातगणना होणे आवश्यक आहे. यासाठी जनगणना आयुक्तांनी राज्यांमध्ये जातगणनेची प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र ओबीसी समाजाला लढाई जिंकायची असेल, तर एकत्रित राहण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

सतर्कतेच्या सूचना

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पोलीस प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांना विशेष यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण, लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास वाहतूक, कायदा-सुव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी प्रचंड वाढलेली असते आणि या वातावरणात आंदोलन झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गावोगावी जय्यत तयारी केली जात आहे. या आंदोलनाला मुंबईकरांचा प्रतिसाद कसा असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच सरकार या आंदोलनाबाबत कोणते निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारला दंगल भडकवायची आहे

मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईकर, आम्हाला लेकरे समजा, आम्ही शांततेत येतोय, पण सरकारला दंगल भडकवायची आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. कोणाचाही बाप आडवा येऊ द्या. आम्ही शांततेत मुंबईत येणार आणि शांततेत आरक्षण घेणार आहोत, सरकारला १०० टक्के दंगल घडवायची आहे, त्यांना मराठ्यांच्या अंगावर जाळ फेकायचा आहे, असे जरांगे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in