...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

उपोषणाला 'एक दिवसाची परवानगी' म्हणजे मराठा राज्य सरकारची समाजाची 'चेष्टा' आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली आडमुठी भूमिका सोडून मराठ्यांना न्याय द्यावा, अन्यथा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण होईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Published on

पुणे : उपोषणाला 'एक दिवसाची परवानगी' म्हणजे मराठा राज्य सरकारची समाजाची 'चेष्टा' आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली आडमुठी भूमिका सोडून मराठ्यांना न्याय द्यावा, अन्यथा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण होईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, मी गोळ्या झेलण्यास तयार आहे, पण आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माझ्या प्रकृतीची काळजी नाही, समाजाच्या वेदनांसमोर ते गौण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे-पाटील हे मुंबईत शुक्रवारपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणार असून शिवनेरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रात्रभर न झोपता २२ तास प्रवास करून शिवनेरी किल्ल्याच्या दर्शनासाठी आलेल्या जरांगे पाटलांनी, पावसाळ्यात दुचाकीवरून मुंबईकडे निघालेल्या मराठा तरुणांची वेदना मांडली. त्यांच्या पाठीमागे खूप मोठ्या वेदना असून, ही बाब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

न्यायालयाने जे सांगितले त्याप्रमाणे आम्हाला करावे लागेल. त्यानंतर आझाद मैदानावर उपोषणाला केवळ एक दिवसाची परवानगी देणे म्हणजे मराठा समाजाचा जाणूनबुजून अपमान आहे. यातून काहीही साध्य होऊ नये असा सरकारचा उद्देश दिसतो. सरकारने मोठे मन दाखवून मराठ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणाला कायमस्वरूपी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यातून समाजात नाराजीची लाट उसळली असून, याचा संदेश राज्यभर गेला आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांना उद्देशून ते म्हणाले, "मराठ्यांच्या नाराजीचा धोका तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी घातक ठरू शकतो. बहुमताची सत्ता मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय आली नाही. आता तुम्हाला मराठ्यांची मने जिंकण्याची योग्य संधी आहे." जरांगे पाटलांनी फडणवीसांना त्यांची मराठाविरोधी भूमिका सोडून मोकळ्या मनाने वागायला सुरुवात करण्याची विनंती केली. "तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत, आम्ही फक्त लोकशाही मार्गाने आरक्षणासाठी तुमच्याशी भांडतो आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी मराठ्यांचा अवमान न करता, त्यांच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा. इमानदार मराठा समाज उपकार कधी विसरत नाही, पण अपमान करणाऱ्याला सोडत नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिंदे समितीने कुणबी नोंदीबाबत दिलेला अहवालही जरांगे पाटलांनी फेटाळून लावला. गॅझेटमध्ये कुणबींची संख्या स्पष्टपणे नमूद आहे, केवळ आकडेवारी नाही, असे ते म्हणाले. सरकार मराठा समाजाला मूर्ख समजत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवनेरीची माती कपाळी लावून जरांगे-पाटील गुरुवारी रात्री मुंबईत पोहोचणार आहेत. २९ ऑगस्टला आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होईल, अशी घोषणा त्यांनी केली. आंदोलकांनी संयम आणि शांतता राखावी, नियमांचे पालन करावे, तसेच कोणत्याही चुकीमुळे समाजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

गरज भासल्यास आंदोलक टप्प्याटप्प्याने ये-जा करू शकतात, जेणेकरून आंदोलनाची धार कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करण्यावरून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. मागील काळात जेव्हा लाठीचार्ज झाला, तेव्हा सणांचा विचार केला नाही, मग आता हिंदू-विरोधी म्हणणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

जरांगे काय म्हणाले ?

मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेटियर लागू करा. १३ महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

सग्यासोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी पुढे काही झाले नाही. मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या... सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या. अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, अशी खंत जरांगेंनी व्यक्त केली.

एका कार्यकर्त्याचे निधन

जरांगे यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलनात कायम सक्रिय असलेल्या सतीश ज्ञानोबा देशमुख या बीड जिल्ह्यातील व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जरांगे यांच्या ताफ्यासोबतच त्यांचे वाहन होते. गुरूवारी सकाळी नारायणगाव येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सरकार झोपले होते का - सपकाळ

दरम्यान, सत्तेत येताच ७ दिवसांत आरक्षण देणार, फडणवीस यांच्या घोषणेचे काय झाले, तीन महिने सरकार झोपले होते का, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर केला आहे.

मराठा व ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही - मुख्यमंत्री

मराठा आणि ओबीसी या दोघांसाठी सरकार काम करणार आहे. मराठा असो वा ओबीसी समाज कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले ते कोर्टात टिकले आहे, असेही ते म्हणाले. लोकशाही पध्दतीने आंदोलनाला आम्ही सामोरे जाऊ. कुठलेही आंदोलन होवो, लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये, उच्च न्यायालयाने या आंदोलनासाठी काही नियम घातले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

चर्चेसाठी कायम तयार - विखे पाटील

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांशी माझे बोलणे झाले. जरांगे हे मुंबईला जाण्यावर ठाम होते, त्यामुळे आम्ही ते मुंबईला आल्यावर चर्चा करु, असे ठरवले. त्यामुळे त्यांना भेटून, चर्चा करुन गैरसमज दूर केला जाईल. राधाकृष्ण विखे म्हणून मी त्यांच्यासोबत चर्चा करणार नव्हतो, मंत्रिमंडळ उपसमिती म्हणून आम्ही कायमच चर्चा करण्यासाठी तयार आहोत. जरांगे यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर केला जाईल, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

आझाद मैदानावर जोरदार तयारी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे वादळ कार्यकर्त्यांसह शुक्रवारी पहाटेपर्यंत आझाद मैदानावर पोहोचणार आहे. जरांगे यांचा भव्य मोर्चा आझाद मैदानात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे हजारोच्या संख्येने अनुयायी आझाद मैदानात जमले आहेत. "एक मराठा लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे" अशा घोषणा देत कार्यकर्ते आझाद मैदानावर धडकले. मैदानात ५० बाय ५० फुटाचा स्टेज बांधण्याचे काम सुरू आहे. अल्युमिनियमचे ग्रील असलेले मटेरियल नट बोल्टने फिट करून स्टेज उभारला गेल्याचे आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी या परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in