Maratha Reservation : सरकारकडून निव्वळ फसवणूक - मनोज जरांगे; उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा समाजाची वर्षभरापासून निव्वळ फसवणूक केली असून मराठा समाज त्यांना धडा शिकवेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी मंगळवारी दिला.
Maratha Reservation : सरकारकडून निव्वळ फसवणूक - मनोज जरांगे; उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले
Maratha Reservation : सरकारकडून निव्वळ फसवणूक - मनोज जरांगे; उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले'पीटीआय'च्या व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
Published on

जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा समाजाची वर्षभरापासून निव्वळ फसवणूक केली असून मराठा समाज त्यांना धडा शिकवेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी मंगळवारी दिला. दुसरीकडे विखे-पाटील यांनी जरांगेना भेटण्यासाठी यापुढे शिष्टमंडळ पाठवले जाणार नाही असे संकेत दिले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक जरांगे यांनी मंगळवारी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उपोषणाच्या ११ व्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावल्याने अखेर त्यांनी मंगळवारी पहाटे वैद्यकीय उपचार स्वीकारत 'सलाईन' लावून घेतले. दुसरीकडे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले असून, जरांगे यांनीही दोन पावले पुढे यावे, असे आवाहन मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले.

वाडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे यांना पाण्याचा अंश कमी होण्याचा त्रास होत होता. मंगळवारी पहाटे २:३० ते सकाळी ७ या वेळेत त्यांना सलाईनच्या ४ बाटल्या देण्यात आल्या. काही मंत्र्यांनी फोनवरून तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी हे उपचार स्वीकारले.

मराठा धडा शिकवतील

'हैदराबाद गॅझेट'च्या आधारे दोन महिन्यांत आरक्षण देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते, त्याचे काय झाले, असा सवाल जरांगे यांनी केला. तसेच विखे पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, विखे पाटलांनी वर्षभर समाजाची दिशाभूल केली आहे, त्यांना याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल.

निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठवाडा दौरा हा केवळ लक्ष विचलित करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत, जरांगे यांनी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथील मराठा बांधवांना १२ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार घटनेच्या चौकटीत राहून जे काही शक्य आहे ते सर्व करेल; परंतु एका समाजाचा हक्क काढून तो दुसऱ्या समाजाला दिला जाणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत मध्यरात्री पार पडलेल्या शासकीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. महायुती सरकारने आतापर्यंत मराठा समाजाशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यापुढेही घटनेच्या चौकटीत राहून आणि न्यायालयाच्या आदेशांच्या अधीन राहून आवश्यक ते निर्णय घेतले जातील, अशे मुख्यमंत्री म्हणाले.

संविधानाच्या चौकटीत जे काही बसणारे आहे, ते नक्कीच दिले जाईल. जे मुद्दे न्यायालयाच्या विचाराधीन आहेत, त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. परंतु एका समाजाच्या आरक्षणाचा वाटा काढून तो दुसऱ्या समाजाला देण्याचा आमचा कोणताही विचार नाही. सरकारने केवळ कागदावर निर्णय घेतले नसून, त्याचे प्रत्यक्ष फायदे मराठा समाजाला मिळताना दिसत आहेत, यावरही त्यांनी भर दिला. जे शक्य आहे ते सर्व आम्ही करू. संवादाचे दरवाजे आम्ही कधीही बंद केलेले नाहीत. चर्चेच्या माध्यमातूनच सरकार मार्ग काढत असते, असे फडणवीस यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in