Maratha Reservation : सगेसोयरे म्हणजे कोण? सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर

कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देण्याची जरांगेंची महत्त्वाची मागणीही राज्य सरकारने मान्य केली. जरांगेंची हीच मागणी कळीचा मुद्दा ठरली होती.
Maratha Reservation : सगेसोयरे म्हणजे कोण? सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर

दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज अखेर मोठं यश मिळालं. मध्यरात्रीच जवळपास तीन तासांच्या चर्चेनंतर राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. यामध्ये कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देण्याची जरांगेंची महत्त्वाची मागणीही राज्य सरकारने मान्य केली. जरांगेंची हीच मागणी कळीचा मुद्दा ठरली होती. राज्य सरकारने काढलेल्या नवीन जीआरमध्ये सगेसोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल याची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे.

वाचा राज्य सरकारचा नवा अध्यादेश जसाच्या तसा -

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी 26, 2024/माघ 6, शके 1945

नियमांचा मसुदा

1. या नियमांस, महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, 2024 असे म्हणावे.

2. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, 2012 याच्या नियम 2 व्याख्या मधील उप-नियम (1) मधील खंड (ज) नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल.

(ज) (1) सगेसोयरे :

सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा आणि त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.

नियम क्र. 5 मधील उप-नियम (6) मध्ये क्रमशः  पुढीलप्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे :

  • कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

  • ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.

  • ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे, त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

  • कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.

  • सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.

  • नियम क्र. 16. अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये : 

  • (ज) उपलब्ध असल्यास, पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in