

जालना : राज्य सरकारने परवानगी दिली किंवा नाही दिली, तरी मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी मुंबईवर धडक मोर्चा काढणारच, असा ठाम निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा व्यक्त केला. मुंबईच्या गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. मात्र सरकारने विघ्न आणण्याची भूमिका घेऊ नये, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
अंतरवाली सराटी येथे पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. मुंबई मोर्चाची तारीख, मार्ग आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी (१२ सप्टेंबर) अंतरवाली सराटी येथे राज्यभरातील मराठा बांधवांची बैठक बोलावण्यात आली आहे.
आम्ही लोकशाही मार्गाने आझाद मैदानावर आंदोलन करणार. तुम्ही शिवरायांना मानणारे असाल तर आंदोलनात विघ्न आणू नका. आम्ही परवानगीसाठी अर्ज केला आहे, सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये, असे ते म्हणाले.
गणेशोत्सव हा लोक समूह एकत्र यावा आणि अन्याय अत्याचार दूर व्हावा म्हणून सुरू झालेला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.
आपण दबाव आणल्याशिवाय सरकार तोंड उघडणार नाही, असे नमूद करून ते म्हणाले की, सरकार किंवा पोलिसांनी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास, मराठा बांधवांनी आपापल्या गावांमध्येच रस्ते अडवून तीव्र निदर्शने करावी. ही घरात बसून बातम्या किंवा बैठका टीव्हीवर पाहण्याची वेळ नाही. ज्यांना येणे शक्य आहे त्यांनी अंतरवाली सराटीत यावे. ज्यांना शेतीची किंवा आर्थिक कामे आहेत, त्यांनी गावात राहून इतरांच्या वाहनांची व्यवस्था करावी.
जीआरची मागणी
सगळ्या मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा बांधवांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्यातून आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने तत्काळ 'शासकीय निर्णय' प्रसिद्ध करावा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
आरोग्यात सुधारणा
दरम्यान, गुरुवारी जरांगे पाटील यांना तीव्र डोकेदुखी आणि मळमळीचा त्रास झाला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले असून, त्यांना चार वेळा आयव्ही फ्लुइड्स देण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांचे पथक २४ तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
सक्ती केल्यास गंभीर परिणाम - दीपके
जालना : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच, या आंदोलनात कोणत्याही प्रकारचा ‘बळजबरीने हस्तक्षेप’ करण्याचा प्रयत्न करू नये, हा महाराष्ट्र आहे आणि असे काही झाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा दीपके यांनी दिला. दीपके यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. राजकीय नेत्यांकडे विनोदवीरांना भेटण्यासाठी वेळ आहे, परंतु मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला कोणाकडेही वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.