राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. राज्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी अमरण उपषोण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या राज्यभर निषेध नोंदवला जात आहे. ठिकठिकाणी रास्तारोको, रॅली, घोषणाबाजी या माध्यमातून लोक आपला निषेध नोंदवत आहेत. काही ठिकाणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागल्याच्या घटना समोर आल्याा आहेत. अशात फुलंब्री तालुक्यात चक्क अंत्ययात्रा काढून मराठा समाज बांधवांनी सरकारचा निषेध नोंदवला.
जालन्यातील अंबड तालुक्यात अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपषोण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले होते. मागील कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील याचिका अनेकदा फेटाळून लावली होती. त्यामुळे ह्या आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. अशात आता पुन्हा एकादा मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेध म्हणून मराठा समाज बांधवांनी तिरडीवर टरबूज ठेवून सरकारचा जाहीर निषेध करीत अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा वाजतगाजत काढण्यात आली होती. यावेळी पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते.