
मुंबई : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण आंदोलन करण्याची बुधवारी घोषणा केली. त्यांनी सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या आहेत, या मागण्या ८ तारखेपर्यंत मान्य झाल्या नाही, तर २९ तारखेपासून मुंबईत आंदोलन होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. इतकेच नव्हे तर येताना एकतर विजयाचा रथ येईल किंवा अंत्ययात्रेचा; असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारला ६ जूनपर्यंतची मुदत दिली आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, शिंदे समितीने चांगले काम केले, त्यांच्याकडून सरकारने काम करून घेतले. त्यामुळे सरकारचे मी कौतुक केले, ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, मात्र अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत. काही अधिकारी जातीयवाद करीत नाहीत. प्रमाणपत्र दिले तर जाणूनबुजून वैधता दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एका मुलाचा प्रवेश रद्द झाला, त्यानंतर दोन-तीन दिवसांत व्हॅलिडिटी मिळाली. हे सरकारचे षडयंत्र तर नाही ना, असा सवालही जरांगे यांनी केला.
ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या फलकावर लावावी, गावात दवंडी देऊन माहिती द्यावी. त्या नोंदींवरून तातडीने प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करावी, जिथल्या नोंदी असतील त्या ग्राह्य धरून मराठ्यांना हक्क दिला पाहिजे. जर कुणी अधिकारी हलगर्जीपणा करीत असेल तर त्याला बडतर्फ करा, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे, असे ते म्हणाले.
मला सोडण्यासाठी २८ रोजी मुले येतील आणि त्यानंतर २९ तारखेला ते माघारी जाऊन शेतीची कामे करतील. माझ्या मुलांना जराही धक्का लागला तर कुणाचीच खैर करणार नाही. मुंबईमध्ये मी शांततेत आंदोलन करणार आहे. २८ ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावण्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेट लागू करा. आमच्या संयमाचा अंत होत आहे. मुंबईत जाताना मी दोनच गोष्टी घेऊन जाणार आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
केसेस मागे घ्या
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, कारण ५८ लाख नोंदी सापडलेल्या आहेत. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा.. कारण ते सगळ्या जाती-धर्मासाठी आहे. सगळ्या गोरगरीबांचे त्यामुळे कल्याण होणार आहे. सगळ्या जाती-धर्मातल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची मागणी आम्ही केली होती. चौथी मागणी, आमच्यावरच्या केसेस मागे घेतल्या जाव्यात. सरकारने शब्द दिला होता. पण आता ते विसरत आहेत. मराठ्यांनीच ही सत्ता मिळवून दिलेली आहे. जातीसाठी मी मरायला भीत नाही. मुंबईत त्यासाठीच येतोय, माझ्यावर हल्ला करायचा प्लॅन असेल तर मीच मुंबईत येतोय. जे आंदोलन आंतरवलीत होणार आहे, तेच मुंबईतही होणार आहे. २९ ऑगस्टला हे आंदोलन होईल, असे जरांगे म्हणाले.