जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा एल्गार पुकारला असून बुधवारी ते आंतरवलीसराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकवटायला सुरुवात झाली आहे.
जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई
Published on

आंतरवाली सराटी : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा एल्गार पुकारला असून बुधवारी ते आंतरवलीसराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकवटायला सुरुवात झाली आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जुन्नर, राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा २८ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे. जरांगे पाटील यांचा ताफा आंतरवाली सराटीच्या वेशीवरुन वडीगोद्री येथे पोहोचला. या मराठा मोर्चाचा आजचा मुक्काम जुन्नरमध्ये असेल.

जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून निघण्यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात दीर्घकाळ आमरण उपोषणाला बसावे लागेल, याची कल्पना मराठा आंदोलकांना दिली. ही आरपारची आणि शेवटची लढाई आहे. कितीही वेळ लागला तरी आपण मुंबई सोडायची नाही, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक महिनाभर मुंबईत राहावे लागेल, अशी तयारी करुन घराबाहेर पडले आहेत. राज्यभरातील गाव गाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून विविध गाड्यांच्या माध्यमातून मराठा समाजबांधव, युवक हे मुंबईकडे निघाले आहेत. दोन महिन्याचा किराणा, गॅस शेगडी व इतर साहित्य घेऊन हे मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातून जरांगे-पाटील यांना मुंबईतील आंदोलनासाठी पाठिंबा वाढत आहे. मुंबईकडे जाण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी बीडमधून मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवली सराटीत दाखल झाले. ट्रकच्या ट्रक भरून मराठा समाजातील सदस्य पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन मुंबईकडे निघाले आहेत.

सरकारशी चर्चा करायला तयार

राज्याच्या राजधानीकडे जाताना पुण्याजवळ सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले. त्यापूर्वी त्यांनी सांगितले की, आपण सगळे जण मुंबईच्या दिशेने निघायचं, थांबायचे नाही. आपण आझाद मैदानावर कायद्याच्या कक्षेत राहून आंदोलन करायचे आहे. २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु होईल. आपल्याला उचकण्याचा प्रयत्न केला जाईल, खुनशी वागणूक दिली जाईल, पण शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई आहे, दम धरुन बाजी जिंकू शकतो. कितीही दिवस लागू दे, संयम सोडू नका.

एक दिवस आंदोलनाची परवानगी

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदानात केवळ एकच दिवस आंदोलनाची परवानगी दिली. तसेच त्यांच्यासमोर अन्य अटी व शर्ती ठेवल्या आहेत. आंदोलनासाठी येताना केवळ पाच वाहनं व केवळ पाच हजार समर्थकांसह आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन सकाळी ९ वाजता सुरू करावे लागेल आणि त्याचा समारोप सायंकाळी ५ वाजता करावा लागणार आहे. अशा अटी पोलिसांनी घातल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in