मुंबई: मराठा आरक्षणासाठी निर्वाणीचा लढा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेले मराठा वादळ अखेर शुक्रवारी (दि. २९)सकाळी मुंबईला धडकले अन् मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले. मुंबईत दाखल झाल्यानंतर जरांगे यांनी उपोषणास सुरुवात केली असून 'आता मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही', असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीहून निघालेले मनोज जरांगे-पाटील अखेर शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे राज्यभरातील हजारो मराठा बांधवही मुंबईत पोहोचल्याने अवधी मुंबई भगवीमय झाली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले. रहदारी सुव्यवस्थित ठेवण्यासाठी मुंबई पोलीस स्थितीचा आढावा घेऊन वेळोवेळी नियोजन करत आहेत.
जरांगेंचा लढा हा राजकीय अजेंडा लक्ष्मण हाके
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणाचा नव्हे तर राजकीय अजेंडा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणाचा नाही. हा लढा एक राजकीय अजेंडा आहे. यात विरोधी पक्षांसह काही सत्ताधारी पक्षांच्याही नेत्यांचा समावेश आहे, असा आरोप हाके यांनी केला. ओबीसी आरक्षण हे शासनकर्त्या व राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण करण्यासाठी आहे. पण ज्यांच्यापासून संरक्षण हवे तेच सगळे लांडगे ओबीसींच्या कळपात घुसले तर या मेंढरांचे काय होईल? असा सवालही त्यांनी याप्रकरणी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथावून लावण्यासाठी जसे विरोधी पक्षांचे आमदार खासदार त्यात सामील आहेत, तसे अजित पवारांचे आमदार, खासदारही त्यात सामील आहेत. मी हे जबाबदारीने सांगत आहे. मी माझ्या पदरचे सांगत नाही. मला राजकीय भानगडीत पडायचे नाही, असा आरोप त्यांनी केला.
तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार - मनोज जरांगे
सरकारने शौचालयाचे कुलुप लावून दारे बंद केली, पाण्याची परिस्थिती तीच आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली की, चहा, नाश्ता आणि जेवणाची दुकानेदेखील बंद केली. आंदोलकांना जेवायला मिळू नये, चहापाणी मिळू नये आणि मराठ्यांनी वैतागून निघून जावे, असे प्रयत्न आहेत. तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार झाले, असा घणाघात मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला. मनोज जरांगे-पाटील यांना प्रशासनाकडून आंदोलनासाठी एक दिवसाची मुदतवाढ मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. 'सरकारने काय केलं ते मला माहीत नाही. त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखी आता उद्याची दिली. माझे म्हणणे आहे, हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने असली डाव खेळावा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे. मराठ्यांचं मनं जिंकणं गरजेचं आहे. मी सकाळीसुद्धा तेच सांगितलं आणि आता सुद्धा तेच सांगतोय. सरकारला आता अशी योग्य संधी आहे, गोरगरीबांची मनं जिंकण्याची योग्य वेळ आहे. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठे विसरणार नाहीत. जर त्यांनी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिले, तर माझा गरीब मराठा मरेपर्यंत ते विसरणार नाही', असे जरांगे म्हणाले. तुम्ही एक-एक दिवस परवानगी दिली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत व अंमलबजावणी होईस्तोवर हे उपोषण होणार आहे. हे आंदोलन मोडायचे की परवानगी द्यायची की मला गोळ्या झाडून मारायचं हे सरकारच्याच हातात आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जे देणे शक्य आहे ते नियमांत बसवून देणार - एकनाथ शिंदे
मराठा समाजाला जे काही देणे शक्य आहे ते, कायद्याच्या व नियमांच्या चौकटीत बसवून विशेषतः कुणाचेही आरक्षण कमी न करता व कुणाचेही नुकसान न करता दिले जाईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणप्रकरणी स्पष्ट केली. शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले होते. आजही ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी आपण शिंदे समिती स्थापन केली होती. त्यात हजारो नोंदी सापडल्या होत्या. ही समिती आजही काम करत आहे. सारथीच्या माध्यमातून आपण विविध कोर्सेस सुरू केले. त्याचाही मराठा समाजाला लाभ होत आहे.
आंदोलनाच्या नावाखाली पोळी भाजू नका, तोंड भाजेल - फडणवीस
काही लोक ओबीसी आणि मराठा समाजाला एकमेकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्हाला दोन्ही समाजाला न्याय द्यायचा असून आंदोलनाच्या नावाखाली काही लोक पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचे तोंड भाजेल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लागावे अशी ठाकरे-पवारांची इच्छा असल्याची टीका फडणवीस यांनी केली. काही पक्ष हे सोईची भूमिका घेत असून त्यांनी ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी मविआला केले. शासनाची भूमिका सहकार्याची आहे. एखादे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू असेल तर त्याला सहकार्य करणे, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर वाहतूककोंडी होते. उच्च न्यायालयाने काही बंधने घालून दिली आहेत. त्यानुसार प्रशासन कार्यवाही करत आहे असे फडणवीस म्हणाले. दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत अशी आपली इच्छा आहे. गेल्या दहा वर्षांत मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आम्हीच केलेय. मराठा समाजासाठी आम्ही सकारात्मक आहोत. त्या समाजाच्या पाठीशी आहोत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये - विखे पाटील
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करत आहेत. याविषयी राधाकृष्ण विखे पाटील यांन विचारले असता ते म्हणाले, मी याआधी पण म्हणालो आहे की लक्ष्मण हाकेचे यात बोलण्याचे कामच नाही. हाके यांनी यात लुडबूड करू नये. त्यांना तो अधिकारही नाही. समाजाचे लोक आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्या ते मांडत आहेत, त्यांना मांडू द्या, त्यांचा अधिकार आहे तो. अन्य समाजाच्या लोकांनी त्यात का हस्तक्षेप करावा? हाके यांचे जे काही बेताल वक्तव्य आहेत ते थांबवले पाहिजेत.
मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा - सदावर्ते
जरांगे कायदाबाह्य बोलतो. जरांगे परत चॅलेंज देतो, सरकारला चॅलेंज देणे म्हणजे कायद्याच्या विरुद्ध कायद्यालाच चॅलेंज देणे. कायदाच मानायचा नाही, अशी वृत्ती आहे. मला जरांगेसारखे माजलेल्या शब्दांत बोलायचे नाही. परंतु, असंस्कृत वर्तन त्याचसोबत लोकांना वेठीस धरण्याचे कृत्य केले जात आहे आणि म्हणून आम्ही तक्रार केली आहे की जरांगेवर 'एफआयआर' दाखल करण्यात यावा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
सरकारकडून आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सरकारकडून आणखी एक दिवसाची मुदतवाढ मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवरील दबाव प्रचंड वाढला आहे.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
आझाद मैदान परिसरात खबरदारी म्हणून हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
सीएसएमटी स्थानकात तुफान गर्दी, प्रवाशांची गैरसोय
आझाद मैदान आणि परिसरात आंदोलन करणारे मराठा आंदोलक पाऊस सुरू होताच सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागले. अगोदरच अनेक आंदोलकांनी रेल्वे फलाट, तिकीट घर आणि स्थानक परिसरात गर्दी केली होती. यामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक स्थानकात येऊ लागल्याने सीएसएमटी स्थानकात तुफान गर्दी झाली. आंदोलकांनी आपल्या गाड्या विविध ठिकाणी पार्किंग केल्या होत्या. या गाड्या पकडण्यासाठी आंदोलक लोकल पकडून पुढे जात होते. लोकल सीएसएमटी स्थानकातच भरत असल्याने अन्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.