लातूर : महाराष्ट्र सरकारने आरक्षणासंबंधात मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. तसेच जे राजकीय नेते खरोखरच आरक्षणाला पाठिंबा देत आहेत, त्यांनाच मराठा समाज समर्थन देईल, असेही त्यांनी बुधवारी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सकल मराठा समाजाच्या सदस्यांसमोर बोलताना जाहीर केले.
सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठ्यांना कोटा देण्याचे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक कायदेशीरदृष्टीने पात्र ठरणार नाही, असा दावाही त्यांनी केला आणि सरकारने मराठ्यांची फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक त्यांनी मंजूर केले ज्याची आम्ही कधीही मागणी केली नव्हती, असेही स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. त्यांना मराठा आंदोलन चिरडून टाकण्याची इच्छा होती, असा आरोप केला. आम्हाला 'सगेसोयरे' (कुटुंबातील नात्याची) अंमलबजावणी हवी आहे. आम्हाला फक्त ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण हवे आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असून, जरांगे म्हणाले की, जे राजकीय नेते मराठ्यांच्या कोट्याला खऱ्या अर्थाने पाठिंबा देतील त्यांनाच समाज पाठिंबा देईल. सर्व पक्षांतील मराठा नेते समाजासाठी काहीही करत नसल्याचा आरोपही जरांगे यांनी यापूर्वी केला आहे. आगामी निवडणुकीत त्यांना मराठा सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.