मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार; 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त विधानभवनात विशेष कार्यक्रम

जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषा पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करू, असा निर्धार व्यक्त करत समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी केले.
मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करू! मुख्यमंत्री 
देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार; 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त विधानभवनात विशेष कार्यक्रम
Published on

मुंबई : जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषा पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करू, असा निर्धार व्यक्त करत समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी केले.

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त शुक्रवारी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी माय मराठीचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात मराठी भाषा शुद्ध होण्यासाठी शब्दकोश तयार केला. त्यावेळी प्रशासन चालविताना मराठीवर फारशी, अरबी या भाषांचे आक्रमण होते. त्यामुळे मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मराठी भाषेचा अभिमान हा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होतो. सुरुवातीच्या काळातील आद्य ग्रंथांमधून आपली मराठी भाषा किती अभिजात आहे हे आपल्याला पाहायला मिळते, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधान मंडळात चालत असलेले कामकाज राजकीय साहित्य निर्मिती करणारे आहे. या कामकाजामधूनच अनेक चित्रपट, नाट्य यांच्या कथानकांना विषय मिळत असतात. मराठीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन राजाश्रय मिळवून दिला आहे. मराठी भाषा, आपल्या भाषेतील साहित्य आणि लोककला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.

तंत्रज्ञान, संशोधन मराठी भाषेतून झाले पाहिजे - राहुल नार्वेकर

मराठी भाषेला समृद्ध करायचे असेल आणि पुढे न्यायचे असेल तर तंत्रज्ञान, संशोधने ही मराठी भाषेतूनच झाली पाहिजेत. तेव्हाच मराठी ही ज्ञानभाषा होईल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला. मराठी भाषा ही देशातील अधिकृत २२ भाषांपैकी एक असून देशात १ हजार ६५२ बोलीभाषा आहेत. मराठी भाषिक लोकसंख्या ही देशात तिसऱ्या आणि जगामध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी भाषेला समृद्ध आणि पुढे नेण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात आला. मराठी भाषा समृद्ध करणे आणि पुढील पिढीपर्यंत टिकवण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची असल्याचेही विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी नमूद केले.

डिजिटल माध्यमांवर मराठीचा अधिकाधिक वापर करावा - सुनेत्रा पवार

तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येक डिजिटल माध्यमांचा उपयोग करताना मराठीचा वापर करत अधिक सक्षमपणे पुढील पिढीपर्यंत समृद्ध मराठीचा वारसा नेण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.

'जावे विनोदाच्या गावा' या विशेष कार्यक्रमामध्ये विनोदी कविता, विडंबन गीत, मराठी गीत सादर करण्यात आले. गायक श्रीरंग भावे आणि गायिका अदिती प्रभुदेसाई यांनी गीत सादर केले. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले मराठी अभिमान गीत यावेळी सादर करण्यात आले. अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी पु. ल देशपांडे यांच्या विनोदी लेखांचे वाचन केले. तर 'जगी हा खास वेड्यांचा पसारा' या जयवंत दळवी लिखित लेखाचे वाचन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले. तसेच विंदा करंदीकर लिखित 'साठीचा गजर' ही कविता ऋषिकेश जोशी यांनी सादर केली.

संकटातही जो विनोद शोधतो तो खरा मराठी माणूस - एकनाथ शिंदे

मराठी माणसाच्या रक्तातच विनोद आहे. विनोद हा समाजामध्ये माणूस जोडणारा पूल आहे. त्यामुळे संकटातही जो विनोद शोधतो, तोच खरा मराठी माणूस, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा गौरव केला. आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे ही मराठी भाषेतील विनोदाची दोन शिखरे आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. मराठीचा वापर सर्व क्षेत्रात व्यवहाराची भाषा म्हणून केला पाहिजे. मराठीच्या समृद्धीची पताका सातासमुद्रापार आपल्याला फडकवत ठेवायची आहे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in