कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची ‘एसीपी’मार्फत चौकशी

कल्याण येथील योगीधाम परिसरातील ‘अजमेरा हाईट्स’ या हायप्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून ‘एमटीडीसी’मधील अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून एका मराठी कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी परप्रांतीय अखिलेश शुक्ला याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी अन्य दोन जणांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची ‘एसीपी’मार्फत चौकशी
Published on

डोंबिवली : कल्याण येथील योगीधाम परिसरातील ‘अजमेरा हाईट्स’ या हायप्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून ‘एमटीडीसी’मधील अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून एका मराठी कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी परप्रांतीय अखिलेश शुक्ला याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी अन्य दोन जणांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची ‘एसीपी’मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

कल्याणच्या योगीधाममधील मराठी कुटुंबाच्या मारहाण प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यातील मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. या घटनेत मारहाण झालेल्या देशमुख कुटुंबीयांचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार असल्याचेही झेंडे यांनी यावेळी सांगितले.

याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून अन्याय्य वागणूक देण्यात आल्याचा आरोप नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने केला आहे. त्याची दखल घेत कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती झेंडे यांनी दिली. तसेच या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. शुक्ला हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. इतर आरोपींना अटक करण्याचे काम सुरू असून सध्या ८ ते १० जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे झेंडे यांनी सांगितले.

मारहाणप्रकरणी राजकारण नको- आ. विश्वनाथ भोईर

कल्याणमध्ये झालेल्या या प्रकाराने आपण आश्चर्यचकित झालो असून याप्रकरणी राजकारण करू नका. मात्र, संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in