पुणे : रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी सक्तीच्या संदर्भात कोणतीही एक महिन्याची किंवा १०० दिवसांची मुदतवाढ दिलेली नाही, असे सांगत त्यांनी १५ ऑगस्ट हीच अंतिम डेडलाइन असल्याचे स्पष्ट केले. १८ ऑगस्टपासून रस्त्यावर उतरून आरटीओ अधिकारी या कायद्याची अंमलबजावणी करतील आणि मराठी न बोलू शकणाऱ्यांचे लायसन्स, बॅच आणि परमिट रद्द केले जातील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
पुण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते शुक्रवारी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात जवळपास १ लाख ३५ हजार रिक्षा व टॅक्सीचालकांनी मराठी शिकण्यासाठी नोंदणी केली असून त्यापैकी कालपर्यंत १ लाख १० हजारहून अधिक चालकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या सर्व यशस्वी चालकांना 'स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी अभियान' अंतर्गत १६ आणि १७ऑगस्ट रोजी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
या अभियानाला महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. दरम्यान, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने राज्यभरात तैनात करण्यात आलेल्या १६०० शिक्षकांच्या माध्यमातून मराठी भाषा सर्वदूर पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न महायुती सरकारने केला असून अ-मराठी चालकांसाठी एका पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.