

मुंबई : महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती असेल. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला होता. पण आमच्या नावावर तो खपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, असा हा प्रकार आहे. पण किमान या निर्णयामुळे दोघे ठाकरे बंधू तरी एकत्र आले. परत ते एकत्र येण्याचे श्रेयसुद्धा मला देण्यात आले. अर्थातच ते एकत्र येण्याने मी आनंदीच आहे आणि मला त्यांना एकत्र आणायचे श्रेयही घ्यायचे आहे, अशी चौफेर टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सविस्तर उत्तर दिले. आपल्या उत्तराच्या भाषणात फडणवीस यांनी विरोधी पक्षाचे आरोप खोडून काढताना अनेकांच्या टोप्या उडवल्या. हिंदी सक्तीच्या विषयावर खुलासा करताना फडणवीस म्हणाले, हिंदी सक्तीचा विषय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच घेण्यात आला. त्याबाबतच्या अहवालावर, मंत्रिमंडळ बैठकीच्या इतिवृत्तावर उद्धव ठाकरेंची सही असल्याचे सांगत त्यांनी सभागृहात कागदपत्रेही दाखवली. त्यावेळच्या समितीत उद्धव ठाकरे गटाचे उपनेते विजय कदम यांचाही समावेश होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
हिंदी विषयाच्या संदर्भात समिती यांनी नेमली आणि निर्णयही घेतला. पण ओरड आमच्या नावाने करण्यात आली. नंतर आमचे राजसाहेबही यांच्यासोबत गेले, असे सांगताना फडणवीस यांनी यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीत कुणाकुणाचा समावेश होता, याची सविस्तर माहिती दिली. या समितीच्या आधारे शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे स्पष्ट करताना फडणवीस यांनी, तुम्ही हिंदी सक्ती केली असली तरी आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात मराठीच सक्तीची राहणार असल्याचे ठामपणे सांगितले.
माझ्याही कार्यालयात धाड टाकण्याची परवानगी
लाचलुचपत प्रतिबंधक खाते हे स्वतंत्र युनिट आहे. आपल्या राज्यात लाचखोरीबाबत ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आहे. मंत्र्यांच्या कार्यालयात कशी धाड पडली, असे तुम्ही विचारता. पण माझ्याही कार्यालयातील एखाद्या व्यक्तीची तक्रार आली तर मला न विचारता ते सापळा लावू शकतात. त्यांना तो अधिकार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
टिपू सुलतानने ७५ हजार हिंदूंची कत्तल केली
टिपू सुलतान आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांइतके मोठे राजे होते, असे म्हणायला आमचा आक्षेप आहे. वर्षानुवर्षे हेच शिकवले की टिपू सुलतान महान राजे होते. पण हे सांगितले नाही की ७५ हजार हिंदूंची आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारे पण तेच होते. इंग्रजांशी ते लढले पण कशासाठी लढले तर स्वत:चे राज्य वाचवण्यासाठी. आता खरा इतिहास सापडतो आहे. ७० वर्षे ‘एनसीईआरटी’ने मोगली साम्राज्याला १७ पाने तर महाराजांना १ पान दिले. आता मोदी सरकारने मराठ्यांच्या इतिहासाला २० पाने दिली आहेत. योग्य वेळी जर नीट इतिहास शिकविला असता तर देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटले नसते, असे फडणवीस यांनी सांगितले.
इंदू मिल स्मारकासाठी ४०० कोटींची तरतूद
इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची स्ट्रक्चरल कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. आता २३० फुटापर्यंत पुतळ्याचे कामही पूर्ण झाले आहे. यावर्षी स्मारकासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली असून स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. त्याला देखील वेग देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
टिपूची तुलना छत्रपतींशी करण्यास आमचा आक्षेप
टिपू सुलतान कसा होता याबद्दल आम्हाला बोलायचे नाही. पण त्याची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यास आमचा आक्षेप आहे. त्याचे गुणगान गाण्यास आमचा आक्षेप आहे. या देशात जे राष्ट्रभक्त मुसलमान आहेत, त्यांच्याबद्दल आमचा आक्षेपच नाही. पण आक्रमण करणाऱ्यांना जे हिरो मानतील त्यांच्या विरोधात आम्ही लढाई करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी
मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केले. शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारने समिती नेमली आहे. त्यामुळे कर्जमाफीबद्दल जे आश्वासन दिले आहे ते योग्य वेळी पूर्ण केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. गेल्यावर्षी संकट आले तेव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘डीबीटी’द्वारे १५ हजार ४७२ कोटी रोख थेट जमा केले. मागच्या अनेक कर्जमाफीत बँका चुकीची खाती दाखवतात असे दिसून आले. आता आपण ‘ॲग्रीस्टॅक’ केले आहे. १०० टक्के शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदणी, सातबाराचा उतारा असा शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केला आहे. कर्जाचे खाते ‘आधार’सीडेड आहे. आपण खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.