कराड : ‘मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे. ही भाषा संपली तर आपले अस्तित्व संपेल याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे. तिचे व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवत मराठीचे वैभव, दरारा आणि मराठीचा दिमाख कायम ठेवणे हे केवळ आपले कर्तव्य नसून ती अत्यंत पवित्र अशी जबाबदारी आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, या साहित्य संमेलनाला ३ कोटी रुपयांचा शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढेही साहित्य संमेलनांना निधी कमी पडणार नाही. भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सातारा येथे १ ते ४ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आदी उपस्थित होते.
संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ...
साताऱ्याच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी झाली. त्या पवित्र भूमीत ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणे ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नाही तर मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा सांस्कृतिक आत्मविश्वासाचा आणि विचार स्वातंत्र्याचा उत्सव आहे. हे संमेलन साहित्याचा आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा संगम आहे. या संमेलनाला साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा गोडवा लाभला आहे. इथल्या लोकांच्या हृदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी भरलेली आहे. शंभरावे साहित्य संमेलनदेखील जोरदार झाले पाहिजे. त्यालाही शासन काही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होणार नाही!
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचे आभार मानले. ते म्हणाले, मराठी भाषेचे व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर मराठी साहित्य, नाटक अशा सर्व माध्यमांना आपण मोठे केले पाहिजे. नव्याने येणाऱ्या साहित्यिकांना मोठे करण्याची जबाबदारी मराठी भाषीकांची आहे. मराठी केवळ ही संवादाची नव्हे तर अर्थाजनाची, रोजगाराची भाषा झाली पाहिजे.
सर्व माजी अध्यक्षांना एक लाखांचा सन्मान निधी
शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या पुढच्या संमेलनात सर्व माजी अध्यक्षांना महादजी शिंदे यांच्या नावे एक लाख रुपयांचा सन्मान निधी देण्यात येत असल्याची घोषणा भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी या व्यासपीठावरून जाहीर केली. याशिवाय संमेलनासाठी ग. दि. माडगुळकर यांच्या नावे निधी जाहीर केला. यावेळी साहित्य परिषदेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सहा वर्षापूर्वी मागितलेल्या ५० लाखांच्या रकमेत भर टाकून एक कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
शतकमहोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात
शतकमहोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात जोशी यांनी ही माहिती दिली. राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये आणि मराठी सक्ती असावी याचा पुनरुच्चार करत जोशी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुबईत विशेष विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.