
माणसाची जडण-घडण, भाषा, संस्कृती भिन्न असली, तरी माणूस आतून एकच असतो. प्रेम कधीही, कुठेही होऊ शकते, त्याला कशाचाच अडसर नसतो. समान भारतीय धागा जुळल्यानंतर प्रांत आणि भाषेचा अडथळा ओलांडून संसार आणि परिवार आनंदी होतो. भाषेचा सातत्याने व सतर्कतेने वापर झाल्यास ती आपोआप आत्मसाद होते आणि तिचे संस्कार रुजत जातात, असा सूर ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादात उमटला.
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे सरहद, पुणे-दिल्ली आयोजित ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात या आगळ्यावेगळ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण सभागृहातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंचावर या दिलखुलास मनमोकळ्या गप्पा शनिवारी रंगल्या.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे - डॉ. साधना शंकर, राजदीप सरदेसाई- सागरिका घोष, रेखा रायकर- मनोजकुमार, डॉ. मंजिरी वैद्य- प्रसन्ना अय्यर यांचा यात सहभाग होता. अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी त्यांना प्रश्न विचारून बोलते केले. यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजदीप सरदेसाई यांनी आपल्या मिश्किल शैलीत पत्नी सागरिका घोष यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगत ओळख करून दिली. माझ्या लिखाणाचे पहिले समीक्षण सागरिकाच करते, याचा कौतुकाने उल्लेख केला. पत्नीला क्रिकेटमधले फारसे ज्ञान नसले, तरी माझ्या सासुबाई मात्र क्रिकेटच्या चाहत्या असल्याने त्यांच्याशी माझी चांगली गट्टी जमली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सागरिका घोष यांनी राजदीप यांच्या कामाचे कौतुक करत आमच्या घरात बंगाल आणि महाराष्ट्र यांचे द्वंद्व सुरूच असते, असे सांगितले. राजदीप सरदेसाई यांच्यासारखा पत्रकार पूर्ण भारतात सापडणार नाही हे नुसती पत्नीच नव्हे तर पत्रकार म्हणून माझे ठाम मत आहे. बातमी ही जणू माझी सवतच आहे. नवरा-बायकोच्या सहजीवनामध्ये बायकोने कधी कधी ऐकूच आले नाही, अशी भूमिका घेतल्यास संसार आनंदी होतो या सासूबाईंच्या सल्ल्याने मी संसार यशाच्या मार्गावर नेला, असेही त्या म्हणाल्या.
साधना उत्तम कलाकार आणि लेखिका आहे. माझी ओढ अजूनही गावच्या मातीत रुजलेली आहेत. तर साधना उच्च शिक्षण घेतलेल्या शहरी वातावरणात वाढलेली आहे. तरीही ती आवडीने खेड्यात रमते, असे सांगून डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, माझ्या फक्त मराठी बोलणाऱ्या आईशी तिचे अनुबंध जुळले होते. नोकरीच्या निमित्ताने देश-परदेशात वास्तव्य असल्याने आमची मुले बहुभाषिक बनली आहेत. डॉ. साधना शंकर म्हणाल्या की, ज्ञानेश्वर यांचा भक्कम पाठिंबा आमच्या संसाराला लाभला आहे. आमचे नाते म्हणजे माझ्या बाजूने ‘लव्ह ॲण्ड हेट’ तर त्यांच्याकडून ‘टॉलरेट’ असे असल्याचे त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
बहुभाषिकत्व आत्मसाद
महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडल्या की आपली इतर संस्कृतींशी ओळख होत जाते. पती मनोज यांचा मराठी नसूनही ‘लाथ मारेन तेथे पाणी काढेन’ हा मराठी बाणा मला विशेष भावला, असे रेखा रायकर म्हणाल्या. लहान वयातच विविध भाषांचे संवादरूप संस्कार झाल्यास बहुभाषिकत्व आत्मसात होते. लग्नानंतर काही प्रमाणात तडजोडी करताना पतीची भक्कम साथ लाभल्यास स्त्रीला बदल स्वीकारणे सुकर जाते. मनोजकुमार म्हणाले, रेखा ही उत्तम पत्नी, कुटुंबात रमणारी असून तिच्या हाताला उत्तम चव आहे. भाषा, संस्कृती याचा प्रत्येक व्यक्तीला अभिमान असणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे कौतुकास्पद आहे. मराठी बोलता येत नसले तरी मला मराठी चित्रपट आणि नाट्यकृती पहायला मनापासून आवडते, असेही त्यांनी विशेषत्वाने सांगितले.
बहुभाषिक असल्यामुळे विविध संस्कृतीचा मिलाफ
डॉ. मंजिरी वैद्य म्हणाल्या की, माझे पती प्रसन्ना अय्यर माझ्यातील कलाकाराचा उत्तम सांभाळ करतात. भाषेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, मुलांचे संगोपन करताना भाषाभेद न ठेवता योग्य वयात मुलांवर भाषेच उत्तम संस्कार केल्यास ते बहुभाषिक बनतात. प्रसन्ना अय्यर यावेळी म्हणाले की, बहुभाषिक असल्यामुळे व्यक्तीमध्ये विविध संस्कृतीचा मिलाफ होतो. मंजिरीचे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो. मी तमीळ आहे. असे असले तरी माझी जडण-घडण महाराष्ट्रातच झाल्याने थोडाफार फरक वगळता आमच्यावर फारसे भिन्न संस्कार झालेले नाहीत. त्यामुळे आमचे सूर सहजतेने जुळले, असे प्रसन्ना अय्यर यावेळी म्हणाले. दरम्यान मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या कार्यक्रमाला शनिवारी उपस्थित होता.
कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले सभामंडपात "कवी कट्ट्याचे" उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कवी कट्ट्याचा दहा वर्षांचा प्रवास उलगडून दाखवला आणि मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
राजन लाखे व गोपाळ कांबळे यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. प्रारंभी राजन लाखे यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी मराठी भाषा संचालनालयाचे संचालक डॉ. शामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक ॲड. प्रमोद अदरकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष रवींद्र शोभणे उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मराठी साहित्याच्या वाढीसाठी कवी कट्ट्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात कवी कट्ट्याचा वर्षांचा प्रवास, मराठी भाषा, साहित्य, आणि मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या संघर्षाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “कवी कट्ट्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दरवर्षी मंडपाचा आकार वाढवत न्यावा लागतो, ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.
कौशल्यातून मराठी पाऊल नक्कीच पुढे; ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चर्चासत्रातील सूर
संकल्पना, मनुष्यबळ, कौशल्य, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची निती, योग्य शिक्षण या सगळ्यांची योग्य मोट बांधली तर राज्याची नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था ट्रिलीयन इकॉनामीपर्यंत नक्की पोहोचेल, असा विश्वास ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केला.
दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिला सत्रात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात पत्रकार पराग करंदीकर, ‘केपीआयटी’चे प्रमुख रवी पंडित, ‘बीव्हीजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड सहभागी झाले होते. त्यांच्याशी पत्रकार, निवेदक प्रसन्न जोशी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण सभामंडपातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व्यासपीठावर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी पाऊल पडते पुढे याचा अन्वयार्थ काय, त्याचे पडसाद कोणकोणत्या क्षेत्रात पडत आहेत, याविषयी जाणून घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
सेवा, शिक्षण आणि अन्य उद्योग क्षेत्रात जेव्हा जेव्हा मराठी पाऊल पुढे पडते तेव्हा तेव्हा त्याची दखल साहित्याच्या माध्यमातून घेण्यात येते. सरस्वतीची उपासना करून लक्ष्मीला प्रसन्न करता येते हे गेल्या पन्नास वर्षांत मराठी माणसाला उमगले आहे. आता मराठी माणसाला व्यवसाय करणे गैर वाटत नाही. व्यवसायात असलेली ‘रिस्क’ घेण्यासाठी आपली मानसिकता तयार झालेली आहे, असे पराग करंदीकर म्हणाले.
हणमंतराव गायकवाड म्हणाले की, उद्योग क्षेत्रात भरारी घेताना आपल्या कामात गुणवत्ता राखली पाहिजे. त्यात सर्वोत्कृष्टपणा आणला पाहिजे. कोणत्याही कामाची लाज न बाळगता ते काम सर्वोत्कृष्ट पद्धतीने केले पाहिजे. जगात संधी आहेत; संधींचा शोध घेतला पाहिजे. मराठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वास्को-द-गामासारख्या खलाशाकडून शोधाची गरज आणि धाडस यासाठी प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
स्टार्टअप इकोसिस्टीम, स्टार्टअप नेशन या संकल्पनांबाबत माहिती देताना रवी पंडित म्हणाले की, कोणतेही काम करताना भावना, महत्त्वाकांक्षा, जिद्द महत्त्वाची ठरते. आपले व्यक्तिमत्व हे आपल्या शब्दांपेक्षा अधिक बोलते. जीवनात काहीतरी भव्य दिव्य करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. आराम हराम आहे, कष्टाच्या मागे धावले पाहिजे, म्हणजे यश मिळतेच.
कार्यक्रमाला भावनिक किनार
बीव्हीजीचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांच्या मातोश्री मराठी भाषेच्या शिक्षिका होत्या. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. असे असताना त्यांना आदरांजली म्हणून गायकवाड साहित्य संमेलनात सहभागी झाले.