रिक्षाचालकांना मराठी बोलता आलीच पाहिजे! मराठी सक्तीवर परिवहन मंत्री ठाम; १ मेपासून मोहीम होणार सुरू

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आणि गुणगान मात्र हिंदीचे गायचे, हे योग्य नाही. इतर राज्यांत हिंदी बोलले जाते का? मग महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणे चुकीचे कसे? असा सवाल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.
रिक्षाचालकांना मराठी बोलता आलीच पाहिजे! मराठी सक्तीवर परिवहन मंत्री ठाम; १ मेपासून मोहीम होणार सुरू
रिक्षाचालकांना मराठी बोलता आलीच पाहिजे! मराठी सक्तीवर परिवहन मंत्री ठाम; १ मेपासून मोहीम होणार सुरू
Published on

ठाणे : महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आणि गुणगान मात्र हिंदीचे गायचे, हे योग्य नाही. इतर राज्यांत हिंदी बोलले जाते का? मग महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणे चुकीचे कसे? असा सवाल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर परिसरात विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली असून, सोमवारी त्यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले.

मराठी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. रिक्षा किंवा टॅक्सी चालवायची असल्यास चालकाला किमान मराठी समजणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) १ मेपासून सुरू करण्यात आलेली मोहीम पुढेही कायम राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मराठीचा नियम जुनाच

मिरा-भाईंदर शहरात मराठी न येणाऱ्या चालकांची छाननी सुरू असून २९ तारखेला त्याबाबतचा अहवाल मिळणार आहे. त्यानंतर ३० तारखेला आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी सक्तीचा निर्णय हा नवीन नसून २०१९ सालापासूनच लागू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंदोलन आणि मोर्चांबाबत बोलताना कोणत्याही दबावाला मी बळी पडणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली.

मनसेकडून निर्णयाचे स्वागत

मनसेने या निर्णयाचे स्वागत केले असून मिरा-भाईंदर परिसरात मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांसाठी शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. याबाबत सरनाईक म्हणाले, आतापर्यंत जे विरोध करत होते, तेच आता शिकवणी सुरू करत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. मराठीसाठी काम करणाऱ्यांचे समर्थन असल्याचेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in