पुणे : सातारा या ऐतिहासिक नगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात येणाऱ्या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाज सुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य तसेच साताऱ्यातील शिक्षण, पर्यटन आणि साहित्य परंपरांचे चित्रण दिसून येणार आहे.
तब्बल ३२ वर्षांनंतर शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे. सारस्वतांच्या या उत्सवात सातारा जिल्ह्याची ओळख दर्शविणारे विविध उपक्रम राबविण्यात येणात आहेत. या निमित्ताने दि. १ जानेवारी २०२६ रोजी शहरातील गांधी मैदान येथून संमेलनस्थळापर्यंत म्हणजेच शाहू स्टेडियमपर्यंत भव्य ग्रंथदिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सातारा जिल्ह्यातील एकूण ५५ शाळा व महाविद्यालयांचे चित्ररथ समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच शिक्षण विभागातून प्रत्येक तालुक्याचा एका या प्रमाणे ११ व जिल्हा परिषदेचा एक चित्ररथ असणार आहे. या चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संत साहित्यातील सुविचार तसेच मराठी सारस्वतांनी मराठी भाषेच्या योगदानासाठी केलेल्या साहित्य निर्मितीचे दर्शन सातारकरांसह संमेलनासाठी येणाऱ्या जगभरातील साहित्यप्रेमींना घडणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
मराठी मातीचा अस्सलपणा जोपासताना या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत पालखी, अबदाऱ्या, छत्र्या, बग्गी, बैलगाड्या, घोडेस्वार यांच्यासह सनई-चौघड्यांचा नाद निनादणार आहे. झांज, लेझिम, बँड पथकासह एन. सी. सी. पथकाचाही यात सहभाग असणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शनही घडणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे सुखद दर्शन घडविणाऱ्या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तसेच स्वागताध्यक्ष श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सहभागी होणार आहेत.
या ग्रंथदिंडीत व शोभायात्रेत रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, डेक्कन ए्ज्युकेश सोसायटी, सातारा एज्युकेशन सोसायटी तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा, यशोदा शिक्षण संस्था यांच्यासह विविध मान्यवर शिक्षण संस्थेतील सुमारे तीन हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत.
चित्ररथांना पारितोषिक
ग्रंथदिंडी व चित्रराथत सहभागी कलाकार, शिक्षक, संस्था, शाळा यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून उत्कृष्ट २५ चित्ररथांना तसेच ११ संचलनास विशेष पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे.