
मुंबई : हिंदी भाषा सक्तीविरोधात येत्या ५ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. या मोर्चात मराठीचा गजर असणार असून मोर्चा यशस्वीतेसाठी मनसे व शिवसेनेने आपापल्या सैनिकांवर जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देसाई, वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात राज्यात संतप्त प्रतिक्रिया आहेत. महायुतीतील नेत्यांनी राज ठाकरे यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. परंतु, राज यांनी सरकारची भूमिका अमान्य असल्याचे सांगत मोर्चाची हाक दिली. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार यांनी देखील मनसेच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ५ जुलैला मोर्चाची तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या चर्चा भेटीगाठी वाढल्या असून काही नेत्यांवर नियोजनाची सोपवण्यात आली आहे. जबाबदारी ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिली असून समाजवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी स्पष्ट केले आहे.
आवाहनाचा 'मोर्चा' लोकलमध्ये!
हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात सर्वसामान्य मुंबईकरांनी सहभागी व्हावे यासाठी मनसेकडून आवाहन करण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकल ट्रेनमध्ये आणि शनिवारी दुपारी १२ वाजता दादर स्थानकात जाऊन प्रवाशांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र - राऊत
शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सांगितले की, दोघे ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येणार आहेत. त्यांच्या एकत्र येण्याचा दोन्ही पक्षाच्या कार्यकत्यांसह सर्वच मराठी जणांना आनंद आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मौचर्चाचे नेतृत्व करतील. मुंबईवर मराठी माणसाचा झंडा फडकावायचा असेल, तर बाळासाहेबांचे विचार पाळावे लागतील. मराठी शक्तींनी यावेळी एकत्र यावे, असेही राऊत म्हणाले.