सुजीत ताजणे/छत्रपती संभाजीनगर
रविवारी आणि सोमवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. पैठण तालुका, जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, वडीगोद्री सर्कलमध्ये पाऊस १८५.३० मिमी, गोंदी १०४ मिमी, सुखापुरी सर्कल ७१.८ मिमी, तर कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी व अंतरवाली सर्कलमध्ये प्रत्येकी ११५ मिमी नोंदवला गेला.
मराठवाड्यातील सर्व मोठ्या नद्यांना पूर आला असून, जायकवाडी, मांजरा, माजलगाव या जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू केला गेला आहे. जायकवाडी धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरीला पाण्याचा विसर्ग १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने करण्यात आला. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणात रविवारी पहाटे १ लाख १३ हजार १४० क्युसेक पाण्याची आवक झाली. धरण प्रशासनाने ९ आपत्कालीन दरवाजासह १८ नियमित दरवाजे साडेचार फुटांनी उचलून विसर्ग सुरू केला.
पुराचे पाणी नाथसमाधी मंदिरापासून मोक्षघाटापर्यंत पोहोचले होते. या परिस्थितीत प्रशासनाने सर्वतोपरी उपाययोजना करून निवासी व पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सततच्या परतीच्या पावसाने हाहाकार उडवला आहे. सप्टेंबर महिन्यातील पाऊस वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पडला असून पिकांना मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की, पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर केला जाईल आणि दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
१० जणांची सुटका
गोदावरीकाठील काही कुटुंबांना नदीकाठी पालटाकी असताना अचानक पूर आला. यामुळे १० जण अडकले होते. तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वडीगोद्रीचे मंडळ अधिकारी संदीप नरूटे, तलाठी कैलास ढाकणे व विनोद कड यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने सर्वांची सुरक्षित सुटका केली.
पिकांचे नुकसान
उजनी शिवारात ‘तेरणा’चे पाणी घुसल्याने साडेतीनशे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. तेरणा प्रकल्पातून सोडलेले पाणी तेरणा नदीत ओसंडून वाहत असून उजनी येथील दहा ते पंधरा दुकाने पाण्याखाली गेली. तसेच, सोयाबीन, मूग, उडीद तसेच उसाची पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहेत.